सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांची बदली पंढरपूर मंदिर सुरक्षा येथे झाली आहे. तर करमाळ्याला नियंत्रण कक्षाचे विनोद घुगे हे पोलिस निरीक्षक म्हणून आले आहेत. त्यांचे मुळगाव बार्शी तालुक्यातील भालगाव आहे. त्यांचा एक भाऊ डॉक्टर आहे. त्यांनी मोहोळ येथे पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहिले तेव्हा त्यांची अतिक्रमणविरोधी केलेली कारवाई गाजली होती.
पोलिस निरीक्षक घुगे यांनी मोहोळ शहरातील रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग, तहसील आवारातील बेशिस्त पार्किंग यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला होता. शिवाजी चौक ते गवत्या मारुती चौक या रस्त्याच्या दुतर्फा व्यापाऱ्यांनी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल असे फलक रस्त्याच्या जवळ व दुकानाच्या काही अंतरावर ठेवले होते ते ही फलक त्यांनी काढायला लावले होते. त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता. बस स्थानकात गैरवर्तन व हुल्लडबाजी करणाऱ्यांवरही त्यांनी कारवाई केली होती. आता ते करमाळ्यात येत आहेत, त्यांची कारकीर्द कशी होणार हे पहावे लागणार आहे.
पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांच्या आदेशाने १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. अक्कलकोटचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा, कुर्डुवाडीचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांची बदली मानव संसाधन व कल्याण शाखा, पंढरपूर मंदिर सुरक्षाचे पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांची बदली जिल्हा विशेष शाखा, बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची बदली बार्शी शहर पोलिस ठाणे, माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांची बदली अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे, बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची बदली नियंत्रण कक्ष, माढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांची बदली सांगोला पोलिस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक निवृत्ती मोरे यांची बदली वैराग पोलिस ठाणे, मानव संसाधन व कल्याण शाखाचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांची बदली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, जिल्हा विशेष सेवा शाखाचे पोलिस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा व पंढरपूर मंदिर सुरक्षाचे पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांची बदली कुर्डवाडी पोलिस ठाणे येथे झाली आहे.