करमाळा (अशोक मुरूमकर) : बागल गटाच्या नेत्या व महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल व भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात नुकतीच भेट झाली आहे. त्यांच्या या भेटीने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बागल गट भाजपबरोबर जाणार असल्याची चर्चा आहे. त्यातच बागल व मंत्री गडकरी यांच्यात झालेली भेट महत्वाची मानली जात आहे.
तालुक्यात दोन महिन्यापूर्वी लोकनेते दिगंबररावजी बागल मामा कृषी महोत्सव झाला होता. या मोहोत्सवात भाजपचे अनेक नेते निमंत्रित केले होते. तेव्हापासून बागल गट भाजपात जाणार का? अशी चर्चा सुरु झालेली आहे. मात्र त्यांनी याबाबत अजूनही स्पष्टपणे भूमिका मांडलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशीही त्यांची भेट झाली होती, अशी चर्चा आहे.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मोहिते पाटील यांच्याशीही त्यांची जवळीक वाढलेली आहे. बागल गटाची माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आदींशी त्यांची जवळीक दिसते. मात्र अजूनही त्यांनी उघडपणे कोणतीच भूमिका मांडलेली नाही. त्यातच मंत्री गडकरी यांच्याशी झालेल्या भेटीमुळे चर्चा रंगल्या आहेत.
मंत्री गडकरी आणि रश्मी बागल यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व त्यांचे पती गौरव कोलते हे गडकरी यांचे स्वागत करताना दिसत आहेत. ही भेट राजकीय होती का? गडकरी यांच्या माध्यमातून बागल गट भाजपा प्रवेश करेल का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल म्हणाल्या, मंत्री गडकरी यांच्याशी एका कार्यक्रमात आमची भेट झाली होती. मंत्री गडकरी व दिगंबररावजी बागल मामा यांचे खूप चांगले संबंध होते. त्या दोघांनीही एकत्रित काम केलेले आहे. या भेटीमध्ये राजकीय काहीही नव्हते. कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली ही भेट होती, असे ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना बागल यांनी सांगितले आहे.