करमाळा (अशोक मुरूमकर) : भाजपचे करमाळा शहराध्यक्ष जगदीश अगरवाल यांना मारहाण झाल्यानंतर संपूर्ण करमाळा एकवटला असल्याचे चित्र दिसले. सर्व पक्षीय, सर्व धर्मीय व सर्व संघटनांनी एकत्र येत आज (मंगळवारी) प्रशासनाला निवेदन दिले असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. करमाळ्यात बाहेरच्याने येऊन अशी दादागिरी केली तर यापुढे खपवून घेतली जाणार नाही जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यातील संशयितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी ‘संशयितांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे’, असे आश्वासन दिले. ‘कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. तालुक्यात शांतता ठेवावी’, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या मारहाण प्रकरणातील सहा संशयित अटकेत असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यांना सोमवारपर्यंत (ता. २१) पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष अगरवाल यांना सोमवारी (ता. १४) त्यांच्या हॉटेलसमोर इंदापूर (जि. पुणे) येथील संशयितांनी मारहाण केली होती. त्यामध्ये सहा जणांना तत्काळ अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे. करमाळ्यात येऊन मारहाण केली असल्याने करमाळकरांमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेते, संघटना व सर्व धर्मियांनी आज प्रशासनाला निवेदन दिले आहे.
अगरवाल मारहाण प्रकरणात करमाळा पोलिसात इंदापूर (जि. पुणे) तालुक्यातील देवा कोकाटे, करण आल्हाट (करमाळा, जि. सोलापूर) यांच्यासह ६-७ संशयितांविरुद्ध १३ कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी ६ संशयितांना तत्काळ अटक करण्यात आली आहे. याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चंदनशिवे हे करत आहेत.
देवानंद नवलचंद कोकाटे (वय 42, रा. सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे), महेश सुग्रीव वगरे (वय २७, रा. वाघेचीवाडी, पाटील वस्ती, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर), ओंकार सुरेश मगर, (वय 37, रा. निमगाव म, ता. माळशिरस, जि. सोलापूर), सचिन पांडुरंग टकले (वय 30, रा. अरणनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, विलास लक्ष्मण काटकर (वय 31, रा. आनंदनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व स्वप्निल संपतराव माने देशमुख (वय 32) अशी अटक संशयिताची नावे आहेत.