सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे तब्बल अकरावेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालेले आबासाहेब ऊर्फ गणपतराव देशमुख यांच्या जीवन चरित्रावर ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख करीत आहेत.
मायाक्का माऊली फिल्म प्रोडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी चित्रपटाचे निर्माते बाळासाहेब एरंडे व मारुती बनकर, दिग्दर्शक अल्ताफ शेख, स्टार कास्ट व उल्हास धायगुडे पाटील उपस्थित होते.
वेडा BF, बेतुका, कम ऑन विष्णू, ब्रेक डाऊन धारावी कट्टा , असे एकाहून एक सरस चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या बहुप्रतीक्षित “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली. ह्या चित्रपटात प्रमूख भूमिका अभिनेता अनिकेत विश्वासराव साकारत असून हर्षद जोशी, विजय पाटकर, अभिनेत्री देविका दप्तरदार, निकिता सुखदेव, ‘सैराट’ फेम अरबाज शेख, तानाजी गुलगुंडे, अहमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, प्रदीप वेलणकर, अनिल नगरकर, छोटा पुढारी वृंदा बाळ आदि कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे, तर चित्रपटातील गाणी बॉलीवूड सिंगर कुणाल गांजावाला आणि मनीष रांजणे यांनी गायली आहेत. छाया चित्रकार कुमार डोंगरे, स्टील फोटोग्राफर राजेंद्र कोरे, वेशभूषा संगीता चौरे व पोर्णिमा मराठे, एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर अमजदखान शेख, विशेष सहकार्य उल्हास धायगुडे पाटील यांचे आहे.