सोलापूर : ‘हीट अँड रन प्रकरणी केंद्र सरकारने नवीन कायदा केलेला होता, परंतु याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील काहीकडून या नवीन कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून आंदोलन सुरू केलेले आहे. सोलापूर येथून एलपीजी, डिझेल व पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या वाहनाची व ड्रायव्हरची अडवणूक केली जात असल्याचे निर्देशनास आलेले आहे. याप्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या सर्व संबंधितावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा प्रशासन व खाजगी वाहतूकदार, ड्रायव्हर संघटना यांच्यात बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व जिल्ह्यातील खाजगी वाहतूक व ड्रायव्हर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, सद्यस्थितीत केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणी नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. त्यामुळे कोणीही अत्यावश्यक सेवेतील एलपीजी, पेट्रोल व डिझेल पुरवठा करणाऱ्या वाहनांची अडवणूक करू नये. अशी आडून करणाऱ्या संबंधितावर पोलीस विभागाकडून गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्टर्स व ड्रायव्हर्स यांच्या पाठीशी प्रशासन असून त्यांना जिल्ह्यात कोठेही अडचण आल्यास तात्काळ महसूल व पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
हिट अँड रन प्रकरणी जिल्ह्यात कोठेही कोणाकडूनही वाहनांची आडवणूक केली जात असल्यास त्याची माहिती वाहतूकदार संघटनांनी व ड्रायव्हरने पोलीस प्रशासनाला तात्काळ द्यावी संबंधितावर त्वरित गंभीर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात वाहनाची वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी पोलीस विभागाकडून पुरेसा बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक श्री. सरदेशपांडे यांनी सांगितले.
यावेळी वाहतूकदार संघटना व ड्रायव्हर यांच्याकडून काही लोकांकडून वाहनांची आडवणूक तसेच ड्रायव्हर लोकांना मेसेज पाठवून धमकावले जात असल्याची तक्रार केली. प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त दिला जात असेल तर एलपीजी, पेट्रोल व डिझेल पुरवठा करणाऱ्या वाहनाची वाहतूक करण्यात येईल असे त्यांच्याकडून प्रशासनाला सांगण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाकडून तात्काळ पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे.