भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा नारळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फुटणार आहे. मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यातील माळशिरस तालुक्यातून हा नारळ फुटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांच्या उपस्थिती यावेळी असणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांनी विरोध केला आहे. मात्र, आता त्यांच्याच बालेकिल्ल्यातून प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे दौरा करत आहेत. त्यांची काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री फडणवीस हे नीरा नरसिंहपूर येथील कुलदैवत लक्ष्मी नरसिंह मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.
भाजपच्या उमेदवारीसाठी मोहिते पाटीलही इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी न देता निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मोहिते पाटील नाराज आहेत. धैर्यशील मोहिते पाटील, त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य शितलादेवी मोहिते पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करून नागरिकांचा कल जाणून घेतला आहे. मोहिते पाटील कुटुंबीय प्रचारासाठी दौरा करत आहे. मतदारांच्या गाठीभेटींवर त्यांचा जोर आहे. त्यामुळे मोहिते पाटील बंडखोरी करणार की उमेदवारीत डावलेले तरी भाजपमध्ये शांत राहणार याबाबत चर्चा सुरु आहेत.