करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षणासाठी आज (शनिवार) श्रीदेवीचामाळ रोड बायपास चौक येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मराठा समाजाच्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यावरुन सगेसोयर्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढललेल्या अधीसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या सूचनेनुसार आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्याला पाठिंबा देण्यासाठी करमाळ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय’, ‘कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशीवय राहत नाही’ अशा घोषणा देण्यात आल्या.
रस्ता रोको दरम्यान नगर- सोलापूर मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला. आंदोलनाची दखल घेऊन मराठा समाजाची मागणी पूर्ण केली नाही तर आणखी आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.