करमाळा (अशोक मुरूमकर) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादीची (अजित पवार गट) आढावा बैठक होणार आहे. यावेळी इच्छूक उमेदवारही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समजत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, सोलापुर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री तथा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, असे तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांनी सांगितले आहे. या बैठकीला तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, आजी- माजी तालुकाध्यक्ष, सर्व सेलचे तालुकाप्रमुख यांच्यासह नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार कार्यकारणीतील महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अवताडे म्हणाले, ‘करमाळा तालुक्यात राष्ट्रवादीकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. माजी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून ही निवडणूक लढवली जाणार आहे. वरिष्ठांचा जो आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही निवडणुकीत लढणार आहोत. स्वबळावर लढण्याचीही आम्ही तयारी केली आहे. सर्व गटात, गणात व प्रभागात आमचे उमेदवार आहेत. जिल्हाध्यक्ष पाटील यांच्याकडे सर्व माहिती दिली जाणार आहे.’
