करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरून माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर निशाणा साधणाऱ्या कर्जत जामखेडच्या आमदार रोहित पवार यांनी करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर टीका करण्याचे टाळले असल्याचे दिसले आहे. त्यांच्याबाबत त्यांनी सावध भूमिका घेतली आहे असून भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांच्यावर मात्र त्यांनी पुन्हा निशाणा साधला असल्याचे दिसले आहे.
करमाळा तालुक्यात एका कार्यक्रमासाठी ते आले होते. तेव्हा माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. आदिनाथ कारखाना हा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाबाबत राष्ट्रीय सहकारी विकास निगम (National Cooperative Development Corporation) ‘एनसीडीसी’ने काढलेल्या नोटीसप्रकरणावर सध्या राजकारण सुरु आहे. कायदेशीरबाबी पूर्ण करून ऋण वसूली न्यायाधिकरण (Debt Recovery Tribunals) ‘डीआरटी’च्या आदेशानुसार आदिनाथ कारखान्याचा ताबा घेण्यासाठी गेल्यानंतर नेमका काय प्रकार झाला होता ‘हे’ सांगत बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. आदिनाथचे नुकसान करण्यास माजी आमदार पाटील हेच जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. विषेशबाब म्हणजे जवळा येथे मिशन जलजीवन योजनेच्या उदघाटनावेळी आमदार रोहित पवार यांनी जाहीर सभेत आदिनाथचे नुकसान करण्यास माजी आमदार पाटील हेच जबाबदार असल्याचे सांगितले होते. मात्र आता त्यांनी वेगळी भूमिका घेतली असल्याचे दिसत आहे. त्यांनी फक्त आमदार राम शिंदे यांच्यावरच लक्ष केले आहे.
पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार रोहित पवार म्हणाले, ‘करमाळ्यातील राजकारण मला माहित नाही. मात्र आदिनाथ बारामती ऍग्रोच्या ताब्यात येऊ नये यासाठी कर्जतचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे हेच जबाबदार आहेत.’ वास्तविक काही दिवसांपूर्वी रोहित पवार हे करमाळ्याचे माजी आमदार पाटील यांच्यावरही ते आदिनाथवरून टीका करत होते. मात्र आता त्यांनी भूमिका बदलली असल्याचे दिसत आहे. आदिनाथबाबत काय कारवाई झाली आहे हे पाहून कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेऊ असे ते म्हणाले आहेत.
पाटील यांच्याबाबत सावध भूमिका का?
आमदार रोहित पवार यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर टीका करणे किंवा त्यांचे नावही घेणे टाळले आहे. मला करमाळ्याचे राजकारण माहित नाही असे ते म्हणाले आहेत. मात्र यापूर्वी ते थेट पाटील यांच्यावर टीका करत होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण पहाता आणि येणाऱ्या काळातील अंदाज बांधून पवार हे पाटील यांच्यावर टीका करणे टाळत असल्याची चर्चा आहे. पाटील हे मोहिते पाटील समर्थक आहेत. आदिनाथ बारामती ऍग्रोच्या ताब्यात जाऊ नये म्हणून शेवटच्याक्षणी पुढे आले होते. तेव्हा कारखाना बागल गटाच्या ताब्यात होता. महाविकस आघाडीचे सरकार गेल्यानंतर हा कारखाना बारामती ऍग्रोकडे जाण्यापासून रोखण्यात आला होता. तेव्हा शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनीच यामध्ये लक्ष घालून कारखान्यासाठी पाटील व बागल यांना एकत्र करत कारखान्याला मदत केली. मात्र त्यानंतर काही दिवसात संचालक मंडळ बरखास्त झाले आणि प्रशासक नियुक्त झाले. प्रशासकांमध्ये पाटील यांना स्थान नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे हे प्रशासकीय सदस्य आहेत. मात्र चिवटे आणि पाटील यांच्यातही पुढे अंतर असल्याचे दिसले. पुढील काळात राजकीय परिस्थिती बदलू शकते हाच अदांज घेऊन पवार यांनी पाटील यांच्याबाबत सावध भूमिका घेतली असल्याची चर्चा आहे.