पुणे : सध्या सुरू असलेल्या राजकीय धोरणांमुळे राज्यातील युवक भरडला गेला आहे. स्पर्धा परीक्षा देणारे तरुण व उत्तीर्ण होऊन सुद्धा बेरोजगार असलेले उमेदवार, कंत्राटी पद्धतीत सुरू झालेली नोकरभरती असे प्रश्न घेऊन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ‘युवा संघर्ष यात्रा’चे आयोजन केले आहे. पुणे ते नागपूर असा या यात्रेचा मार्ग असणार आह.
२४ ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्ताने पुण्यात पदयात्रेला प्रारंभ होईल. सावित्रीबाई आणि महात्मा फुले तसेच लाल महाल येथे नतमस्तक होऊन पाच ते सहा किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली जाईल. त्यानंतर शिरुर तालुक्यातील वढू तुळापूरला संभाजी महाराज यांना वंदन करून दुसऱ्या दिवसापासून पदयात्रेला पुन्हा प्रारंभ होणार आहे. नऊ ऑक्टोबरला यात्रेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर होणार आहे. पदयात्रेदरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी शरद पवार येणार आहेत, असे रोहित पवार यांनी सांगितले. कंत्राट भरतीला स्थगिती द्यावी. तलाठी भरतीसह अन्य परिक्षांसाठी असलेले शुल्क रद्द करावे. दत्तक शाळांचा आदेश रद्द करावा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळे आहेत पण तेथे औद्योगिक कंपन्या आल्या नाहीत त्या ठिकाणी प्रकल्प आणावेत यासारख्या मागण्या या पदयात्रेद्वारे करण्यात येणार आहेत.
राज्यात चुकीच्या धोरणांचा फटका हा सर्वसामान्य युवांना बसत आहे. सरकारच्या या धोरणांचा राज्यात सर्वत्र विरोध होत आहे. अशातच विविध भागात आंदोलने होत आहेत. परंतु सरकार मात्र आपल्या राजकारणात व्यस्त असल्याने त्यांचे या विषयाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. आमदार पवार म्हणाले, ‘सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फी परवडत नसल्याने फी कमी करण्याची मागणी विधानसभेत आम्ही आग्रहीपणे मांडली. यावेळी सिरीयसनेस यावा यासाठी परीक्षा फी १००० रुपये ठेवल्याचे सरकारने सांगितले. पेपरफुटी संदर्भात सांगितलं तर सरकार हक्क भंग आणण्याची भाषा करते, कंत्राटी भरतीचा मुद्दा मांडला तर सरकार सांगते एका कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन कर्मचारी काम करतील.’
‘सरकारच्या संवेदना संपल्या असून सरकार तरुणांना गृहीत धरून चालत आहे. याच पार्श्वभूमीवर गांधी जयंतीच्या निमित्ताने आम्ही शरद पवार यांच्याशी याबाबत चर्चा केली आणि यावेळी त्यांनी राज्यव्यापी ‘युवा संघर्ष यात्रा’ काढून युवांशी संवाद साधण्याच्या सूचना आम्हाला केल्या. त्यानुसारच राज्यातील तरुणांशी संवाद साधण्यासाठी आणि युवाला पाठिंबा देण्यासाठी एका नवीन उपक्रमाची सुरुवात आपण करत असल्याचे,’ आमदार पवार यांनी सांगितले.