करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहा उमेदवारांना घेऊन आम्ही निवडणुकीत उतरू असा दावा बागल विरोधी गटाचा सुरुवातीपासूनच होता. मात्र यातून दोन उमेदवारांनी शेवटच्या तासाभरात माघार घेतली. सत्ताधारी बागल गटाला त्यांची मनधरणी करण्यात यश आले मात्र त्यांच्या अर्ज मागे घेण्यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे ऐकलंय ते खरंय का? असं म्हणण्याची वेळ आली आहे.
मकाई निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा सोमवार (ता. २२) शेवटचा दिवस होता. बागल विरोधी गटाचे फक्त सात अर्ज मंजूर झाले असल्याने निवडणूक लागणार की नाही याची सर्वांनाच उत्सुकता होती. निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून पडद्यामागे अनेक घडामोडी घडत होत्या. त्याचा अंदाज बागलविरोधी गटालाही आला होता. स्वाभामिनी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे यांनी सकाळीच ‘पाच जागांसाठी निवडणूक लागेल एक जागा आमची कमी होईल.’ असे सांगितले होते. ‘संपूर्ण पॅनल होत नसल्याने केकान हे माघार घेतील. त्यांची मनधरणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे’, असे ते म्हणाले होते. अखेर त्यांची मनधरणी करण्यात विरोधी गटाला यश आले नाही.
अर्ज मागे घेण्याच्या एक तास आधी बागल गटाचे एक ज्येष्ठ नेते तहसील कार्यालयाच्या आवारात आले. आणि त्यांनी दोन अर्ज मागे घेतले जातील. बाकीचे दोन अर्ज मागे घेतले जातील, असा दावा त्यांनी केला होता. मात्र त्यांना त्यांची मनधरणी करण्यात यश आले नाही. शेवटी वेळ संपेपर्यंत चार उमेदवार तिकडे न फिरकल्याने निवडणूक लागली.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालय परिसरात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. अमित केकान आणि बाबुराव आंबोदरे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर बागल गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व नेते दिग्विजय बागल यांची मध्यस्ती यामध्ये यशस्वी झाली’ अशी चर्चा होती. तर बागल विरोधी गटाकडून मात्र ‘यामध्ये मोहिते पाटील यांनी मध्यस्ती केली.’ असे सांगितले. त्यामुळेच त्यांनी माघार घेतली अशी चर्चा होती. तर अर्ज मागे घेतेवेळी केकान आणि जाधव यांच्याबरोबर असलेले काही कार्यकर्ते मात्र ‘हे बागल गटाला गिफ्ट देत आहोत. आम्ही लढलो तरी कारखाना बागल गटाकडेच राहणार आहे. कारखाना अडचणीत आहे. त्यात निवडणूक लागली तर पुन्हा खर्च होणार. आणि आम्ही विजयी झालो तरी फरक पडत नाही. मग लढून तरी काय?’ म्हणून माघार घेतली असल्याची चर्चा तेथे होती.
अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर ज्यांचे अर्ज राहिले ते तहसील कार्यालयात आले. तेव्हा ‘आम्हालाही अर्ज मागे घेण्यासाठी विनवणी केली जात होती. बागल गटासह पाटील गटाच्याही काही कार्यकर्त्यांनी आम्हाला मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला’, असे खळबळजनक वक्तव्य केले. मात्र आम्ही निवडणूक लढण्यावर ठाम होतो. अशा उलटसुलट चर्चा तहसील कार्यालय परिसरात ऐकायला मिळत होत्या. मात्र या चर्चाचे वास्तव काय आहे हा महत्वाचा विषय आहे.