करमाळा (सोलापूर) : उमरड येथील शेतातील विद्युत ट्रांसफार्मरमधील ३० ते ४० हजार किंमतीच्या साहित्याची चोरी झाली असून त्याचा तपास लावण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. नितीन बदे यांच्या शेतात असलेल्या १०० एचपी क्षमतेच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल, ॲल्युमिनियम कॉइल व इतर साहित्याची आज्ञात चोरट्याने बुधवारी रात्री आठची लाईट गेल्यानंतर चोरी करून ट्रांसफार्मरवरून फेकून दिला आहे.
ट्रांसफार्मर पोलवरून खाली पडल्याने ट्रांसफार्मर बॉडीचेही नुकसान झाले आहे. सध्या तालुक्यात अशा प्रकारच्या चोरीचे प्रकार होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उमरड येथे ट्रांसफार्मर साहित्याच्या झालेल्या चोरीचा तपास लावण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. चोरीनंतर महावितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन त्याचा पंचनामा केला असून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवत असल्याचे सांगितले आहे.
यापूर्वी या भागातील विद्युत मोटारी केबल स्टार्टर अशा शेती साहित्याची चोरी होत होती. परंतु सध्या ट्रांसफार्मरमधील साहित्याचीही चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्यांमधून या चोऱ्यांना कायमचा पायबंध घालण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली जात आहे.