करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सदस्यपदासाठी १४१ व सरपंचपदासाठी २१ अर्ज दाखल झाले आहेत. माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांनी जेऊर ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या नियंत्रणाखाली करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शुक्रवारी (ता. २०) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत इच्छुकांनी तहसील परिसरात गर्दी होती.
करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात आज सकाळपासून इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. रामवाडी येथील गौरव झांजुर्णे यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याबरोबर रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष श्री. वारगड उपस्थित होते. घोटी येथील इच्छुकांनीही आज तहसील परिसरात गर्दी केली होती. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
सदस्यपदासाठी प्राप्त अर्ज : कावळवाडी 17, रामवाडी 7, भगतवाडी 2, उंदरगाव 5, चिखलठाण 7, गौंडरे 19, कंदर 3, कोर्टी 13, केत्तुर 14, वीट 21, घोटी 18, रावगाव 1, जेऊर 14 अर्ज आले आहेत. तर निंभोरे, केम व राजुरी येथे एकही अर्ज आलेला नाही. सरपंच पदासाठी कावळवाडीत 4, रामवाडीत 1, चिखलठाण 2, गौंडरे 4, कंदर 1, कोर्टी 2, केत्तुर 4, वीट 1, घोटी 1 जेऊर येथे १ अर्ज दाखल झाला आहे. तर रावगाव, निभोरे, केम, भगतवाडी, राजुरी व उंदरगाव येथे एकही अर्ज आलेला नाही.