करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत व माजी आमदार नारायण पाटील यांच्यात आज (रविवारी) चार भिंतीत चर्चा झाली आहे. या चर्चेवेळी मात्र दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता. साधारण पंधरा मिनिटे त्यांच्यात ही चर्चा झाली असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. नुकताच करमाळ्यात शिवसेनेचा मेळावा झाला होता. तेव्हा माजी आमदार पाटील हे गैरहजर होते, तेव्हा तेव्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी पाटील यांना अनेकदा फोन केला पण प्रतिसाद दिला नसल्याचे विधान केले होते. त्यानंतर मंत्री सावंत यांनी ही भेट घेतली आहे.
मंत्री सावंत हे आज सीना बोगद्याची पहाणी करण्यासाठी आले होते. अचानक त्यांनी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान माजी आमदार पाटील यांच्या जेऊर येथील संपर्क कार्यालयात भेट दिली. मिळालेल्या माहितीनुसार पाटील यांना मंत्री सावंत हे येत असल्याचे समजल्यानंतर त्यांनी माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, माजी सभापती अतुल पाटील यांच्यासह ग्रामपंचातीचे सदस्य व इतर काही कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच मंत्री सावंत हे त्यांच्या कार्यालयात दाखल झाले.
मंत्री सावंत व पाटील यांच्यात चार भीतीत चर्चा झाली. तेव्हा त्यांनी दरवाजा उघडा ठेवला होता. मात्र त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजलेला नाही. लोकसभा निवडणूक आणि गेल्या काही दिवसांपासून करमाळा तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट दिसत आहे. त्यात त्यांनी पाटील यांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे.
माजी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरुवातीलाच पाठींबा दिला होता. आदिनाथ कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री शिंदे हे कारखान्यावर आले होते. मंत्री सावंत यांच्याच माध्यमातून हा कारखाना बारामती ऍग्रोकडे जाण्यापासून रोखण्यात आला होता. मात्र त्यानंतर मंत्री सावंत व पाटील यांच्यात दुरावा असल्याचे चित्र दिसत होते. बागल यांनीही भाजपमध्ये काही दिवसांपूर्वी प्रवेश केला आहे. अशा स्थितीत शिवसेनेला मरगळ आल्याचे चित्र शिवसेनेच्या मेळाव्यात जाणवले होते. मात्र आता मंत्री सावंत यांनी स्वतः पाटील यांची भेट घेतली असून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, असे बोलले जात आहे.