करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष जो उमेदवार देईल त्याला मताधिक्य देणार आहे, असे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी संवाद साधला.
तालुकाध्यक्ष वारे म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. तरुणाचे संघटन करून पक्ष वाढवला जात आहे. सध्या शरद पवार यांची राष्ट्रवादी अडचणीत आहे. मात्र त्यांना सहानुभूती देखील आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तालुक्यातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आम्ही मताधिक्य देणार आहोत. उमेदवार कोण हे आमच्यासाठी महत्वाचे नसून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करायचे हे आमचे ध्येय आहे. पक्ष वरिष्ठ पातळीवर योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले आहे. तरुणांना बळ मिळावे व उत्साह वाढावा म्हणून नुकताच पदाधिकारी मेळावाही घेतला होता. तेव्हा चांगला प्रतिसाद मिळाला होता. अभयसिंग जगताप यांच्या माध्यमातूनही काही दिवसापासून करमाळा तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले असे, वारे म्हणाले आहेत.