करमाळा (अशोक मुरूमकर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे करमाळ्यातील आमदार नारायण पाटील यांनी दिल्लीत शरद पवार व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. मतदारसंघातील कामकाबाबत त्यांनी चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. यावेळी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत काय चर्चा झाली का? याबाबत मतदारसंघात उत्सुकता लागली आहे. दिल्लीत राष्ट्रवादीच्या बैठकीलाही ते गेले होते.
तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या आदिनाथ कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. १७ एप्रिलला कारखान्यासाठी मतदान होणार असून उमेदवारी मागे घेण्यासाठी २ एप्रिलपर्यंत मुदत आहे. अडचणीत असलेल्या या कारखान्याची ही निवडणूक कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात २७२ इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने उत्सुकतेचा विषय ठरला आहे. दोन दिवसांपूर्वी मोहिते पाटील समर्थकांचीही बैठक झाली होती. त्यानंतर आता दिल्लीत पाटील यांनी खासदार मोहिते पाटील व पवार यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आले आहेत. विशेष म्हणजे आमदार पाटील यांनी स्वतः हे फोटो शेअर केले आहेत.
तालुक्याच्या राजकारणात पाटील यांच्यासह माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गटाची भूमिका महत्वाची रहाते. पाटील व जगताप हे विधानसभा निवडणुकीपासून एकत्र आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत होत आहे. यामध्ये बागल व शिंदे एकत्र येतील असे बोलले जात आहे. मात्र ते काय करतील हे पहावे लागणार आहे. पाटील यांनी घेतलेल्या पवार व मोहिते पाटील यांच्या भेटीत कारखान्याबाबत काय चर्चा झाली का याचा तपशील समजू शकलेला नाही.
