सोलापूर : राज्यातील सर्व जिल्ह्यात एप्रिल 2023 पासून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम सुरू असून लवकरच सोलापूर जिल्ह्यात हा उपक्रम होणार आहे. सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख व त्यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्मपणे नियोजन करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शासन आपल्या दारी नियोजन आढावा बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी धीरज चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोम्पे, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले, उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी तसेच ऑनलाइनद्वारे सर्व एसडीओ, तहसीलदार, बीडीओ, सर्व नगरपालिका मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे म्हणाले की, शासन आपल्या दारी हा उपक्रम खूप मोठ्या स्वरूपाचा असून प्रत्येक शासकीय विभाग प्रमुखांनी त्यांना दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडावी. यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही. प्रत्येकाने अलर्ट मोडवर काम केले पाहिजे. हा कार्यक्रम एक आवाहन म्हणून स्विकारावा व त्याचे संधीत रूपांतर करून आपला कार्यक्रम राज्यात उत्कृष्ट होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनिस्त व तालुकास्तरीवरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन कार्यक्रमाचे रूपरेषा त्यांना समजावून सांगावी. प्रत्येक विभागाने जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी गावोगावातून घेऊन येणाऱ्या आपले लाभार्थी हे आरोग्यदृष्ट्या सुदृढ असले पाहिजे याची खबरदारी घ्यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थी पोहोचण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ठोंबरे यांनी करून विविध समितीच्या माध्यमातून प्रत्येक समित्यावर सोपवलेली जबाबदारी त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांनी परस्परांत योग्य समन्वय ठेवून पार पाडावी असेही त्यांनी सुचित केले आहे.
निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी शासन आपल्या दारी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा स्तरावर करण्यात आलेल्या विविध समित्यांची माहिती देऊन त्या समितीमध्ये असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी सांगितली. हा उपक्रम आपल्याकडे लवकरच होणार असून शासनाकडून सूचना आल्यानंतर आठ दिवसात हा कार्यक्रम आपल्याला घेता येईल या अनुषंगाने प्रत्येक विभागांनी आपली तयारी करावी. तसेच जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातून विविध शासकीय यंत्रणांनी तहसीलदार यांच्या समन्वयातून किती लाभार्थी आणले पाहिजे याची माहिती दिली.
पंढरपूर 7 हजार, मोहोळ सांगोला, माळशिरस व मंगळवेढा तालुका प्रत्येकी 5 हजार, माढा 3 हजार, करमाळा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुका प्रत्येकी 1 हजार व बार्शी 3 हजार या पद्धतीने एकूण 37 हजार लाभार्थी आणण्याचे नियोजन असून यासाठी एसटी महामंडळाकडून 600 बसेसची मागणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक तालुक्यातील लाभार्थी आणण्याचे उद्दिष्ट यापूर्वी होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने देण्यात आलेले असले तरी तालुका निहाय उद्दिष्ट कमी जास्त होईल परंतु एकूण उद्दिष्ट तेच राहील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या विविध भागातून या कार्यक्रमासाठी येणाऱ्या कोणत्याही लाभार्थ्याला त्रास होणार नाही याबाबत प्रशासनाने योग्य ती काळजी घेणे अपेक्षित आहे. स्टॉल साठी मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध असावी व त्यामध्ये विविध विभागाचे माहितीपर स्टॉल असावेत. यामध्ये मुख्यमंत्री कक्षाचाही स्टॉल ठेवावा, यामध्ये निवेदन स्वीकारले जाणार आहेत. त्याप्रमाणेच कार्यक्रमाच्या ठिकाणी स्तनदा माता यांच्यासाठी हिरकणी कक्ष सर्व सोयी सुविधांनी युक्त असावा. कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला भोजन व्यवस्थित मिळाले पाहिजे व त्याचा अहवाल ही द्यावा. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नियुक्त केलेल्या सर्व समित्यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी, अशा सूचना मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी धीरज चव्हाण यांनी दिल्या.