करमाळा (सोलापूर) : करमाळा एमआयडीसीमधील पाच पाच गुंठ्याचे १० भूखंड उद्योजकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.
यापूर्वी करमाळा एमआयडीसीमध्ये दोन एकर, पाच एकर, १० एकर असे भूखंड होते. त्याचे छोटे- छोटे भूखंड करावेत, अशी मागणी होती. यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार पाच ते सहा गुंठ्याचे 90 प्लॉट उपलब्ध करण्यात आले आहेत. यापैकी पहिले १० प्लॉट वितरणासाठी उपलब्ध केले असून 23 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. ज्या उद्योजकांना हे प्लॉट घ्यायचे आहेत त्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत.
१० भूखंडाचे वाटप झाल्यानंतर 60 ते 70 भूखंड वाटपासाठी तयार असून तेही तात्काळ एक वर्षभरात सर्व उद्योजकांना देण्यात येतील. याशिवाय तात्पुरती पाणी पुरवठा योजना करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चार कोटी मंजूर केले असून याचेही काम लवकर सुरू होणार आहे.