करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे आज (बुधवारी) सांयकाळी ७ वाजता होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेसाठी पोलिसांचाही तगडा बंदोबस्त राहणार आहे. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांसह ९० पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे यांचा समाज बांधवांशी संवाद दौरा सुरु आहे. त्यामध्ये करमाळा तालुक्यात भीमा नदीच्या काटावर (उजनी धरणाच्या कुशीत) वांगी १ येथे १७१ एकरावर सभा होणार आहे.
वांगी येथील सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही बंदोबस्त राहणार आहे. सकल मराठा समाज करमाळा तालुकाच्या वतीने वांगी येथील सभेचे नियोजन केले जात आहे. यामध्ये मोठ्याप्रमाणात समाज बांधव उपस्थित राहतील. हा अंदाज धरून संपूर्ण नियोजन केले जात आहे. त्यासाठी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून वांगी परिसरातील सर्व गावांमधील समाज बांधव ही सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या सभेच्या ठिकाणी ९० पोलिसांचा बंदोबस्त राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी सांगितले आहे.