करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पूजा ढेरे यांची तर उपसभापतीपदी माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक राष्ट्रवादीचे (अजित दादा) ऍड. अजित विघ्ने यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार नारायण पाटील यांचे समर्थक माजी सभापती अतुल पाटील यांच्या पत्नी अदिती पाटील यांनीही सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतल्याने ढेरे यांची बिनविरोध निवड झाली. ढेरे यांच्या निवडीमुळे करमाळ्यात पहिल्यांदाच भाजपचा सभापती झाला आहे.
करमाळा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया आज (गुरुवार) पंचायत समितीच्या सभागृहात झाली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक म्हणून गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम होते. करमाळा तालुक्यात पंचायत समितीचे १२ सदस्य आहेत. त्यात माजी आमदार शिंदे यांचे चार समर्थक आहेत. ते घड्याळ या चिन्हावर विजयी झालेले आहेत. आमदार पाटील यांचे चार समर्थक आहेत. ते करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून विजयी झाले आहेत. तर बागल यांचे चार समर्थक असून ते भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर विजयी झाले आहेत.
करमाळ्याचे सभापतीपद ओबीसी महिला आरक्षित होते. वीट व उमरड या गणात हे आरक्षण होते. ढेरे या वीट गणातून विजयी झाल्या आहेत. तर अदिती पाटील या उमरड गणातून विजयी झाल्या होत्या. सभापती म्हणून ढेरे यांचे नाव आदीच चर्चेत होते. मात्र उपसभापती पदासाठी शेवटपर्यंत सस्पेन्स दिसला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी ऍड. विघ्ने यांना उपसभापतीपदाची लॉटरी लागली.
ऍड. नितिनराजे भोसले यांनी निवडणुकीचे अर्ज दाखल करताना शेवटच्याक्षणी माजी आमदार शिंदे यांची साथ सोडून पाटील गटात प्रवेश केला होता. त्यानंतर ऍड. विघ्ने यांना केत्तूर गणातून उमेदवारी मिळाला होता. त्यात त्यांचा विजयी झाला. त्यांना मिळालेली उमेदवारी ही लॉटरीचं समजली जात होती. आता वनमाला सरडे, अवताडे यांची नावे चर्चेत असताना माजी आमदार शिंदे यांनी धक्कातंत्र वापरत ऐनवेळी ऍड. विघ्ने यांना संधी दिली. त्यामुळे ही देखील त्यांना लॉटरीचं समजली जाऊ लागली आहे.
