करमाळा (सोलापूर) : मांगी येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. त्यातच वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र अजूनही बिबट्या सापडलेला नाही. आज एका वासरावर बिबट्याने हल्ला केला. येथे आमदार संजयमामा शिंदे यांनी भेट देऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नागेश बागल यांच्या शेतात आज बिबट्याने हल्ला केला. त्या ठिकाणी आमदार शिंदे यांनी भेट दिली. तेव्हा वनविभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या व पिंजरे वाढीव बसविण्यात सांगितले आहे. यावेळी वनविभागाचे परिमंडळ अधिकारी बाळासाहेब लटके, वनरक्षक एस. आर. कुर्ले, सुजित बागल, अभिमान अवचर, तुषार शिंदे, सुरज ढेरे, आदेश बागल, नागेश बागल, पोलिस पाटील आकाश शिंदे, मनोज शिंदे व शेतकरी उपस्थित होते.
