Ramdas Zol sir you are also responsible for the overdue sugarcane bill of Rajuri Govindaparva Polkhol Part 2

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या गोविंदपर्व ऍग्रो प्रॉडक्स प्रा. लि. कारखान्यावरून सध्या दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांना घेरले जाऊ लागले आहे. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने ‘पोलखोल’च्या माध्यमातून ‘प्रा. झोळ सर एकदा गोविंदपर्वचे काय झाले ते सांगाल का?’ असे वृत्त दिल्यानंतर या कारखान्याकडे थकीत रक्कम असलेले शेतकरी आता तक्रार करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. कारखाना अडचणीत येण्यासाठी प्रा. झोळ हे देखील जबाबदार आहेत, असा त्यांचा आरोप आहे. यावर प्रा. झोळ हे काय खुलासा करतील हे पहावे लागणार आहे.

करमाळा तालुक्यात आदिनाथ, मकाई, कमलाई व विहाळ येथील भैरवनाथ हे साखर कारखाने आहेत. राजुरीतील गोविंदपूर्व ऍग्रो प्रॉडक्स प्रा. लि. हा जिल्हा बँकेने लिक्विडिशनमध्ये काढलेला कारखाना आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार या कारखान्याकडे साधारण १४ कोटी कर्ज (मुद्दल) आहे. यामध्ये नऊ कोटी स्थावर मालमत्तेवर व ५ कोटी कर्ज हे उत्पादीत मालावरील असल्याचे सांगितले जात आहे. व्याजासह ही रक्कम ३० कोटीच्या दरम्यान असल्याचे कोर्टी शाखेतून सांगितले आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २०२३- २४ च्या वार्षिक अहवालात प्रशासक कुंदन भोळे यांनी या कारखान्याची लिक्विडिशन प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगितले आहे. आरपीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेप्रमाणे खरेदीदार कंपनीने ४ कोटी ७५ लाख भरणा केले आहेत. याबाबत एनसीएलटी न्याय प्राधिकरण, मुंबई येथे हे प्रकरण असल्याचे त्यांनी अहवालात म्हटले आहे. दरम्यान याबाबत कोर्टी शाखेत चौकशी केली तेव्हा पुढे काय झाले हे समजले नसल्याचे सांगितले आहे. कारखाना देखरेखीसाठी बँकेकडून कर्मचारी नियुक्त केल्याचे बँक इन्पेक्टर यांनी सांगितले आहे.

गोविंदपूर्व ऍग्रो प्रॉडक्स कारखान्याकडे शेतकऱ्यांची देणी राहिलेली आहेत. त्याला प्रा. रामदास झोळ हे देखील जबाबदार आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर संबंधित शेतकरी म्हणाला, ‘कारखान्याला ऊस द्यावा यासाठी प्रा. झोळ यांनी आमच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर आम्ही भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्था येथे थकीत पैसे मागण्यासाठी गेलो होतो. तेव्हा आम्हाला पैसे दिले जातील असे सांगितले होते. पैसे मिळावेत म्हणून कारखान्यावर आंदोलनही झाले होते. मात्र अद्याप पैसे मिळाले नाहीत. शेतकरी संघटना देखील इतर कारखान्यावर थकीत ऊसबिलासाठी आंदोलन करते मात्र येथे लक्ष देत नाही.’ त्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत ‘काय सांगता’च्या युट्युब चायनलवर व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये शेतकऱ्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रा. झोळ हे देतील का? शेतकऱ्यांची देणी देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्ही कायम शेतकऱ्यांसमवेत…
कारखाना कोणताही असो त्याने वेळीच शेतकऱ्यांची देणी दिली पाहिजेत. एखाद्या कारखान्याकडे थकीत ऊसबिल राहिले असेल तर त्यांनी ते त्वरित दिले पाहिजे. तालुका पातळीवर कोण पदाधिकारी वेगळी भूमिका घेत असेल तर त्याला जाब विचारला जाईल, असे शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे यांनी स्पष्ट केले आहे. (या कारखान्याबाबतची आणखी माहिती पुढील भागात)

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *