सोलापूर : वनवास काळात प्रभुश्रीराम यांना भेटणार्या शबरीची भक्ती ही सर्वश्रेष्ठच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने आयोजित पु ना गाडगीळ प्रायोजित दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणी कार्यक्रमात तिसर्या आणि समारोपाच्या दिवशी श्रीराम भक्त शबरी या विषयावर ते बोलत होते.
रामायण हे वैद्यिक सिंध्दांत सांगतो, उच नीच असा भेदाभेद करत नाही. सीता मातेचे हरण झाल्यानंतर प्रभु श्रीराम अरण्यातून जात असताना वाटेत भेटलेल्या अनेकांपैकी शबरीची भक्ती ही सर्वश्रेष्ठच आहे. एका भिल्ल समाजातील महिलेने दिलेले उष्टे बोर खाताना प्रभु श्रीराम कोणताही उच नीच असा भेद करत नाहीत.असेही त्यांनी सांगितले. प्रभु श्रीराम यांच्या वनवास काळात त्यांच्या सानिध्यात आलेले निषादराज गुहा, नावाडी केवट आणि शबरी या व्यक्तीरेखांबाबतचे वर्णन तीन दिवसाच्या विवेकाच्या अमृतवाणीमधून करण्यात आले. मैत्रीमधून स्नेह जपणारा निषादराज गुहा, समर्पणातून सेवा करणारा केवट आणि निस्वार्थ भक्ती करणारी शबरी असा हा प्रवास तीन दिवसात उलगडण्याचा प्रयत्न विवेकजी घळसासी यांनी केला. प्रत्येकाने निषादाराज, केवट आणि शबरी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येकाने आपले मूळ धर्मग्रंथाचे वाचन केले पाहिजे आपली संस्कृती ही भेदाभेद करणारी नाही असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते निरूपणकार विवेक घळसासी यांना पुष्पहार अर्पण करून या तिसर्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सकाळी 6.25 ते 7.30 या वेळेत झालेल्या विवेकाच्या अमृतवाणी कार्यक्रमासाठी रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम सुरू होण्यापुर्वीच अॅम्फी थिएटर खचाखच भरलेले होते. तीन दिवस मोठ्या संख्येने रसिकश्रोत्यांनी या कार्यक्रमाला मोठी दाद दिली. समारोप करताना उपस्थित रसिक श्रोत्यांनी सामुहिकपणे हनुमान चालिसा म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने आयोजित पुना गाडगीळ प्रायोजित तीन दिवसाच्या विवेकाच्या अमृतवाणी कार्यक्रमासाठी प्रशांत बडवे, हास्यसम्राट प्रा. दिपक देशपांडे, अमोल धाबळे, गुरू वठारे, अविनाश महागांवकर, सुयश गुरूकुलचे केशव शिंदे, आर्यन क्रिएशनचे विनायक होटकर आदी उपस्थित होते.
सामुहिक हनुमान चालिसा म्हणून कार्यक्रमाची सांगता
तीन दिवसापासून सुरू असलेल्या विवेकाच्या अमृतवाणी या पहाट व्याख्यान कार्यक्रमासाठी अॅम्फी थिएटर सभागृहात रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. खुर्च्या भरलेल्या असतानाही रसिकांनी जिथे जागा मिळेल तेथे पायर्यावर आणि स्टेजवरही बसून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. आणि कार्यक्रमाच्या शेवटी सामुहिकपणे हनुमान चालिसा म्हणून विवेकाच्या अमृतवाणीची यंदाच्या वर्षीची सांगता करण्यात आली. भल्या पहाटे हनुमान चालिसा सामुहिकपणे म्हणण्याची ही सोलापूरमधील पहिलीच वेळ आहे.