सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात व विकासात ज्यांची नावे घेतली जातात त्यापैकी एक म्हणजे सहकारमहर्षी कै. शंकरराव मोहिते- पाटील! आज (रविवारी, 11 फेब्रुवारी) त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना करमाळा येथील जेष्ठ पत्रकार विवेक येवले यांनी एक आठवण सांगितली आहे.
ज्येष्ठ पत्रकार येवले म्हणाले, ’20 ऑक्टोबर 1969 ला अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वडील ज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्यसैनिक कै. शंकरराव येवले दादा यांनी ‘साप्ताहिक सल्ला’ या करमाळा तालुक्यातल्या पहिल्या वृत्तपत्राची सुरुवात केली. पत्रकारितेचा तो काळ आणि एकूणच राजकारण, समाजकारण, पत्रकारिता आदी क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेली त्या काळातली पिढी ही स्वातंत्र्य चळवळीच्या मुशीत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष घडलेली असल्याने नितिमत्ता, ध्येयवाद, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांचे बऱ्यापैकी भान असणारी आणि त्यानुसार आचरण करणारी होती. त्या काळची पत्रकारिता, वृत्तपत्रे चालवणं हे अक्षरशः सतीच वाण आणि घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणं! असाच प्रकार होता. विशेष म्हणजे त्या काळात समाजकारण, राजकारण, पत्रकारिता या सर्वच क्षेत्रात कार्यरत, अग्रेसर असलेली पिढी ही आपापल्या कामात झोकून देणारी, प्रसंगी त्यासाठी प्रपंचावर पाणी सोडण्याची मानसिकता असणारी आणि अपवाद वगळता आर्थिक दृष्ट्या कफल्लक अशी परंतु ध्येयवाद जोपासणारी होती हे निश्चित!’
पुढे त्यांनी म्हटले आहे की, ‘साप्ताहिक सल्ला सुरू झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच म्हणजे 22 नोव्हेंबर 1970 ला करमाळ्यातील पालिकेसमोर झालेल्या सभेमध्ये जिल्हा राजकारणात बडे प्रस्थ असलेले नेते माळशिरसचे तत्कालीन आमदार सहकारमहर्षी शंकरराव मोहिते- पाटील यांनी साप्ताहिक सल्ला व त्याचे संपादक शंकरराव येवले यांच्याविरुद्ध टीकात्मक काही भाष्य केले. सहकारमहर्षींच्या या वक्तव्याचे त्या काळात त्यांनी टेप रेकॉर्डिंग करून घेतले होते आणि त्या आधारे आयपीसी कलम 500 नुसार करमाळा न्यायालयात अब्रूनुकसान भरपाईचा खटला दाखल केला आणि या वृतामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. याला प्रत्युत्तर म्हणून सहकारमहर्षींनी देखील आमच्या दादांविरुद्ध न्यायालयीन फिर्याद दाखल केली. माळशिरस न्यायालयात दावा दाखल केला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या वादाकडे वेधले गेले. या दाव्यासंदर्भात न्यायालयात हजर रहाण्यासंदर्भात न्यायालयाने समन्स बजावून देखील हजर न राहिलेल्या सहकारमहर्षींविरुद्ध न्यायालयाने वॉरंट बजावल्यानंतर अखेर एका तारखेला सहकारमहर्षी आपल्या लव्याजम्यासह हजर झाले, ही बातमीदेखील साप्ताहिक सल्लामध्ये ठळक अक्षरात प्रसिद्ध करण्यात आली होती.’
सहकारमहर्षीविरुद्ध आमचे दादा हा लढा म्हणजे त्या काळात, “कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टानी!” असाच प्रकार होता. तुलनेने सर्वच अर्थाने कफल्लक असलेल्या आमच्या दादांविरुद्ध माळशिरस न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याला देखील तोंड देणे, वकील देणे आणि तारखेला हजर रहाणे हे देखील क्रमप्राप्त होते. त्याकाळात सहकारमहर्षींचा रोष पत्करणे, त्यांच्या मनाविरुद्ध अकलूज- माळशिरस परिसरात पाऊल टाकणे हे अक्षरशः अग्निदिव्य अथवा सिंहाच्या गुहेत पाऊल टाकण्यासारखेच होते. पण त्या वेळी देखील सहकारमहर्षींच्या बलाढ्य ताकदीला वैचारिक, तात्विक विरोध असणारी काही मंडळी होती. त्यातीलच एक असलेले माळशिरस तालुक्यातल्या मळोलीचे ॲड. कै. जयसिंगराव जाधव यांनी एक रुपया देखील न घेता दादांचे वकीलपत्र घेतले, तसेच माळशिरसचे एक मातब्बर नेते सहकारमहर्षींचे राजकारणातील अनुयायी मात्र वैचारिक विरोधक असलेले कै. विष्णुपंत कुलकर्णी, माळशिरसचे पत्रकार कै. गोविंदराव देव ही मंडळी दादांच्या पाठीशी उभी राहिली. अशा परिस्थितीत दादांनी एसटीने करमाळ्यावरून अकलूज व तेथून पुढे दुसऱ्या एसटीने माळशिरस असा प्रवास करून दोन तारखांना हजेरी लावली. या घडामोडीत सर्वात आश्चर्यचकित करणारी घटना म्हणजे ॲड. जाधव यांनी काही निमित्ताने एका तारखेला अकलूजला एका जाहीर सभेचे आयोजन करून दादांचे भाषण आयोजित केले होते. हा खटला सुरू असताना हा वाद मिटावा म्हणून सहकारमहर्षींचे सहकारी, माजी आमदार कै. चांगोजीराव उर्फ बाबुराव देशमुख यांनी करमाळ्यात येऊन दादांची भेटदेखील घेतली होती.
1972 साली एका तारखेला माळशिरसच्या न्यायालयात आमचे दादा आणि सहकारमहर्षी दोघेही हजर होते आणि त्यावेळी अकलुजमध्ये आदरणीय विजयदादांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. आणि तारखेला वादी- प्रतिवादी हे दोघेही हजर असताना त्यावेळी सहकारमहर्षींनी तत्कालीन न्यायाधीश जोशी साहेबांना विजयदादांच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका दिली तेव्हा न्यायाधीश जोशी साहेब यांनी तुमचा दावा माझ्या न्यायालयात सुरू असल्याने मी तुमच्या मुलाच्या लग्न समारंभाला उपस्थित राहू शकणार नाही असे सांगितल्यानंतर सहकारमहर्षींनी या दाव्यापेक्षा माझ्या मुलाच्या लग्नाला तुम्ही हजर रहाणे हे मला अधिक महत्त्वाचे आहे असे सांगून हा दावा मिटवून घेण्याची भूमिका घेतली, ती आमच्या दादांनी देखील तात्काळ मान्य केल्यानंतर जोशी साहेबांनी दोघांचेही अभिनंदन केले आणि भर कोर्ट हॉलमध्ये दोघांची गळाभेट घडवून आणली. आणि त्यावेळी सहकारमहर्षींनी न्यायाधीश जोशी साहेबांच्या हातून विजयदादांच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका आमच्या दादांना दिली आणि जोशी साहेबांप्रमाणेच तुम्हीही माझ्या मुलाच्या लग्नात मला हवे आहात असे दिलदारीने आग्रहाचे आमंत्रण दिले. हा वाद आणि खटला त्या क्षणी मिटलाच पण त्यानिमित्ताने भर न्यायालयात घडलेला एक अविस्मरणीय आणि कदाचित अभूतपूर्व प्रसंग म्हणावा लागेल तो म्हणजे न्यायालयाचे कामकाज सुरू असताना ते थांबवून कोर्ट हॉलमधले टेबल्स एकमेकांना जोडून जोशी साहेबांनी हा दावा दोघांनीही आपल्या शब्दाचा मान राखून मिटवून घेतला म्हणून चहापानाचा कार्यक्रम करविला. अर्थातच विजयदादांच्या विवाह समारंभाला आमचे दादा आवर्जून उपस्थित राहिले होते आणि त्या लक्षगर्दीत देखील सहकारमहर्षींनी दादांचे यथोचित स्वागत केले होते.
नंतर काही अडचणींमुळे काही काळ साप्ताहिक सल्लाचे नियमित प्रकाशन बंद पडले होते. आमच्या दादांची पिढी ही वैचारिक दृष्ट्या समृद्ध असली तरी आर्थिक दृष्ट्या काही अपवाद वगळता कफल्लक होती मात्र तरीही सर्व तऱ्हेच्या प्रतिकुलतेला तोंड देत ध्येयवाद, नीतिमूल्ये जोपासणारी होती हे मात्र खरेच होते. 1974 साली साप्ताहिक सल्लाच्या पुनरप्रकाशनाचा कार्यक्रम ठरला, या अंकाचे प्रकाशन सहकारमहर्षींच्या हस्ते, दैनिक संचारचे संस्थापक/संपादक पत्रमहर्षी, दादांचे ज्येष्ठ बंधुतुल्य स्नेही कै. रंगाअण्णा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आणि तत्कालीन नगराध्यक्ष कै. गिरधरदासजी देवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम जुन्या नगरपालिकेच्या आवारात 21 एप्रिल 1974 रोजी संध्याकाळी चार वाजता करण्याचे ठरले होते. मला तो प्रसंग अजूनही संपूर्ण आठवतो, रंगाअण्णा आणि कार्यक्रमासाठी आलेल्या निमंत्रित पाहुण्यांची दुपारी दोनच्या सुमारास आमच्या वाड्यातल्या माडीवरच्या हॉलमध्ये जेवणाची पंगत सुरू होती आणि सहकारमहर्षी अचानक ठरलेल्या वेळेपूर्वीच गिरधरदासजी देवी, नगरसेवक व कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन त्यांच्या त्याकाळी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या एयर कंडीशनर इम्पाला कारमधून आमच्या वाड्यासमोर येऊन लगेच जिना चढून वर आले. त्यांच्या अचानक येण्यामुळे उडालेल्या धांदलीमुळे जेवणारी मंडळी लगबगीने जेवण उरकून ताटांवरुन उठली आणि मग सुरू झाल्या गप्पा ! जेवण करून आल्याचे सांगून सहकारमहर्षी व अन्य कार्यकर्त्यांनी सरबत घेतले आणि मग सगळे मिळून कार्यक्रमस्थळी रवाना झाले.
त्यानंतरच्या काळात आमच्या दादांचे स्नेहसंबंध सहकारमहर्षींबरोबर मनापासून जुळले, सहकारमहर्षी काही निमित्ताने करमाळ्यात आले की हे दोघे एकमेकांची आवर्जून भेट घेत असत, तसेच सहकारमहर्षी हे उपक्रमशील नेते असल्याने अकलूज परिसरात त्यांचे नेहमीच विविध उपक्रम, कार्यक्रम, मेळावे सुरू असत. त्या कार्यक्रमांचे दादांना आवर्जून निमंत्रण असे आणि दादा देखील आवर्जून त्या कार्यक्रमाना जात असत. मला आठवतंय, बहुदा 1975 साली सहकारमहर्षींनी अकलूजला खूप मोठे कृषी प्रदर्शन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते, विजयदादा त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष होते. या मेळाव्यास उदघाटक म्हणून तत्कालीन परराष्ट्रमंत्री यशवंतरावजी चव्हाण, तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण, अनेक मंत्री व मान्यवर नेते उपस्थित होते. या मेळाव्यास मी व आमचे दादा कै. नामदेवरावजी जगताप यांच्या समवेत त्यांच्या पद्मिनी फियाट गाडीतून गेलो होतो. (अगदी लहानपणापासून आम्हा चार भावंडांपैकी कदाचित धाकटा असल्यामुळे असेल पण बऱ्याचदा दादांबरोबर असायचो आणि दादाही मला घेऊन जायचे)
त्या काळातले राजकारण आणि एकूणच समाजजीवनामध्ये नैतिकता बऱ्याच अंशी पाळली जायची, रेडिओ व वृत्तपत्रे हीच प्रसारमाध्यमे असल्याने समाजजीवन आजच्या तुलनेने संथ आणि शांत होते त्यामुळे कुठलीही घटना, दुर्घटना, दैनंदिन सामाजिक जीवनात घडणारे प्रसंग खूप दिवस चर्चेत रहायचे. त्यामुळे कै. शंकरराव येवले व सहकारमहर्षी कै. शंकरराव मोहिते- पाटील यांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेले खटले व त्यानंतर झालेली दिलजमाई हा विषय सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय व समाजजीवनात बराच काळ चर्चेचा ठरला होता. या निमित्ताने दोन्ही शंकररावांमध्ये निर्माण झालेले “मैत्र” हे पुढे सहकारमहर्षींच्या निधनापर्यंत कायम राहिले.
- विवेक शंकरराव येवले, करमाळा.