करमाळा (सोलापूर) : कोंढारचिंचोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, कोंढरचिंचोलीचे सरपंच शरद भोसले, गणेश करे पाटील यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
मकाईचे संचालक रामभाऊ हाके, ऍड. नितीनराजे भोसले, नागनाथ लकडे, आदिनाथचे माजी संचालक किरण कवडे, मोहन धांडे, डॉ. गोरख गुळवे, जायभाय किशोर, माजी संचालक नंदकिशोर भोसले उपस्थित होते. प्रा. झोळ म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी केवळ दीड दिवस शाळेत जाऊन तब्बल ३५ कादंबऱ्या, १३ कथासंग्रह, १० प्रसिद्ध पोवाडे, पटकथा वगनाट्य, लावणी यांची निर्मिती केली. फकिरा, वारणेचा वाघ, पाझर, गुलाम, वैर अशा प्रसिद्ध कादंबऱ्या, कृष्णाकाठच्या कथा, गजाआड, चिरानगरीची भूत, जिवंत काडतूस असे कथासंग्रह आणि माझा राशियाचा प्रवास हे पुस्तक लिहिले. त्यांनी उपेक्षित समाजाला न्याय दिला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून त्याचा आदर्श घेऊन वाटचाल करावी. या कार्यक्रमात राज्यस्तरीय विशेष तज्ञ शिक्षक पुरस्कार प्राप्त तुकाराम पाडोळी, राजेंद्र गलांडे, अक्षय गलांडे, भीमराव खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला.