करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) तालुकाध्यक्षपदी अमरजित साळुंखे यांची निवड झाल्यानंतर आज (शुक्रवार) संतोष वारे यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून वारे यांची ही नियुक्ती केली असल्याचे बोलले जात आहे.

वारे हे करमाळा तालुकाध्यक्षपदी होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार नारायण पाटील व लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी काम केले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे पद गेल्याने राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरु झाली होती. अखेर त्यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार मोहिते पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल तोडकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष केशव चोपडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमरजीत साळुंखे, माढा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिन नलवडे, वीट सोसायटीचे चेअरमन संतोष ढेरे यांच्या उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
वारे यांनी सीना नदी पूरस्थितीत चांगले काम केले आहे. पांडे जिल्हा परिषद गटात त्यांच्या पत्नी राणी वारे या उमेदवारीसाठी दावेदार आहेत. त्यांनी या भागात चांगला संपर्क ठेवला आहे. आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके व बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्याशी त्यांची चांगली जवळीक आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार का हे पहावे लागणार आहे.
