करमाळा (सोलापूर) : नाशिक जिल्ह्यातील श्रावण चव्हाण हत्याप्रकरणात गुन्ह्याचा वेगाने तपास सुरू असून फरार असलेल्या संशयित महिला आरोपीचा करमाळा पोलिस शोध घेत आहेत. फॉरेन्सिक लॅबनेही तपासासाठी नमुने घेतले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर अनेक गोष्टींची उलघडा होणार आहे, अशी माहिती करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी दिली आहे. यावेळी पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे व तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मिटू जगदाळे उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील श्रावण चव्हाणची आईबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी एका कारमध्ये मृतदेह व कार पेटवण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार घडला आहे. करमाळा शहर पोलिस हद्दीत करमाळा- नगर हायवेच्या बाजूला कुकडी कॅनलजवळ एका कारमध्ये हा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी हा प्रकार लक्षात आला होता.
यातील संशयित आरोपी हे दोघे सख्खे भाऊ आहेत. सुनील घाडगे व राहुल घाडगे अशी त्यांची नावे आहेत. तेही नाशिक जिल्ह्यातीलच आहेत. त्यांना करमाळा पोलिसांनी तत्काळ अटक करून न्यालयासमोर हजर केले होते. त्यांना करमाळा न्यायालयाने सहा दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. त्याचा पुढील तपास करमाळा पोलिस करत आहेत. याचा उलघडा करण्यासाठी पोलिस सर्व बाजूने तपास करत आहेत. यातील फरार असलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीचा शोध करमाळा पोलिस घेत आहेत, असे पाटील यांनी सांगितले आहे.