करमाळा तालुक्यात असलेल्या चार साखर कारखान्यांपैकी मकाई हा एक सहकारी साखर कारखाना आहे. सुरुवातीपासून हा कारखाना बागल गटाच्याच ताब्यात आहे. यावेळी सुद्धा हा कारखाना ताब्यात ठेवण्यात यश बागल गटाचे नेते दिग्विजय बागल व रश्मी बागल यांना यश आलेले आहे. याची फक्त औचारिकता बाकी असून आज याचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीत बागल विरोधी गटाचे सात अर्ज मंजूर झाले आहेत, आज यातील कोण माघार घेणार की रिंगणात उतरणार हे समजणार आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याची १७ जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीत ७५ अर्ज आले होते. अर्ज छाननीत ३९ अर्ज मंजूर झाले होते. नामंजूर झालेल्या अर्जामध्ये बहुतांश अर्ज हे बागलविरोध गटाचे होते. त्यात मकाई बचाव समितीचे प्रा. रामदास झोळ व मोहिते पाटील समर्थक सविताराजे राजेभोसले यांचाही अर्ज नामंजूर झाला होता. त्यानंतर त्यांच्यासह १८ उमेदवारी निवडणुकी निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध सोलापूर प्रादेशिक सहसंचालक (साखर) राजेंद्रकुमार दराडे यांच्याकडे अपील केले होते. मात्र तेथे बागल गटाला दिलासा मिळाला आणि विरोधकांना धक्का बसला आहे. दराडे यांनी टोंपे यांचा निर्णय कायम ठेवत अपील केलेले अर्ज नामंजूर केले आहेत.
बागलविरोधी गटाकडे म्हणजे प्रा. झोळ, राजेभोसले व समविचारी आघाडीचे विशाल पाटील यांनी केलेल्या दाव्यानुसार मंजूर झालेल्या सात उमेदवारांना घेऊन आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहेत. यामध्ये मंजूर झालेले अर्ज सात असले तरी त्यांना सहाच जागांवर लढता येणार आहे. त्याचे कारण भिलारवाडी ऊस उत्पादक गटात दोन जागा निवडणून द्यायच्या आहेत. त्यांचे तीन अर्ज आहेत. सुनीता गिरंजे, अप्पासाहेब जाधव व आंबोदरे यांचे अर्ज मंजूर आहेत. तेथे दोन जागा निवडणूक द्यायच्या असल्याने येथे कोण मागे घेणार हे पहावे लागणार आहे. गिरंजे या येथे माघार घेऊ शकतात कारण महिला राखीवमध्ये त्यांचा अर्ज मंजूर झाला असल्याने त्या तेथे अर्ज ठेवतील, अशी शक्यता आहे.
वांगी ऊस उत्पादक गटात अमित केकान, पारेवाडी गटात गणेश चौधरी व मांगी गटात सुभाष शिंदे यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. हे सर्व अर्ज आज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहणार की, कोण मागे घेणार हे पहावे लागणार आहे. आज याचे चित्र स्पष्ट होणार आहे. गिरंजे, केकान, जाधव आदींनी अर्ज मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. चौधरी, शिंदे हेही आमच्याबरोबर आहेत, ते अर्ज मागे घेणार नाहीत, असा दावा प्रा. झोळ यांनी केला आहे. या निवडणुकीत प्रा. झोळ यांच्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे हे बरोबर आहेत.