करमाळा (अशोक मुरूमकर) : साधारण सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या करमाळ्याला अखेर तहसीलदार मिळाले आहेत. शिल्पा ठोकडे यांची येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली असून आज (मंगळवारी) त्या पदभार स्वीकारणार आहेत. शिल्पा ठोकडे यांनी कांगल, दक्षिण सोलापूर आदी ठिकाणी काम केले आहे. वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. लेडी सिंघम म्हणून त्यांची ओळख झाली होती. करमाळ्यात त्यांची नियुक्ती झाली असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना आदर्श तहसीलदार म्हणून पुरस्कार प्राप्त झाला होता.
प्राणाची पर्वा न करता भ्रष्टाचार थांबविणे, वाळूचोरी थांबविणे, अवैध धंद्यांना आळा घालणे, महसूल वाढविणे यांसह अनेक कार्य पूर्ण क्षमतेने करणाऱ्या ठोकडे यांचा १०० पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. अधिकारी म्हणून कार्याव्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी जप्त त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.
ठोकडे यांनी तलाठी महिलांना कर्नाटकी साडी व अधिकाऱ्यांना सदरा धोतर असे वेशांतर करायला लावून त्यांनी वडापच्या गाडीतून जतमार्गे भीवघाटात ठाण मांडले होते. रात्री वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना त्यांनी पकडले होते. एका रात्रीत तब्बल १३ ट्रक पकडून त्यांनी एक कोटी ६० लाखांचा दंड वसूल केला होता. ही घटना राज्यभर गाजली होती. या त्यांच्या धडक कारवाईमुळे सोलापूर, सांगली जिल्ह्यातून वाळू तस्करी करणाऱ्या तस्करांना बेकायदा वाहतूक बंद करणे भाग पडले होते.
वाळू माफियाकडून अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रमाण महाराष्ट्रात नेहमी पाहावयास मिळते. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या घरावर वॉच ठेवणे, कुटुंबाला धमकी देणे, मुलांच्या गाडय़ांचा पाठलाग करून दमदाटी करणे, भीती निर्माण करण्याचे प्रकारही झाले होते. पण त्यांनी या सगळ्या गोष्टीना कधीच भिक घातली नव्हती. त्यांची आता करमाळ्यात बदली झाल्याने काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.