करमाळा (सोलापूर) : लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता जाहीर होण्यापूर्वी सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करा, समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, अन्यथा मराठा समाजाच्या नाराजीची लाट शिंदे व फडणवीस यांना सोसावी लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
करमाळा तालुक्यातील वांगी येथे एका विवाहसोहळ्यासाठी ते आले होते. जरांगे म्हणाले, तुमच्या शब्दाला आम्ही मान दिला आहे. सहा महिन्यापासून आम्ही हे आंदोलन सुरू केले आहे. तुम्ही काय शब्द दिला होता हे विसरलात का? सरकारने शब्द पाळला नाही तर विश्वास घातकी असा शिक्का पडेल, असेही ते म्हणाले आहेत. 9 मार्चची वाट पाहू अन्यथा पुढची दिशा ठरवू, असेही ते म्हणाले आहेत. मराठा समाजाला आडवे चालण्याची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार नाहीत. अन्यथा मराठे त्यांची नाराजी कशी व्यक्त करायची ते करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाच्या मनातून उतरले तर पुढच्या पायऱ्या चढणे अवघड होईल, असेही ते म्हणाले आहेत.
मनोज जरांगे हे वांगी येथे आले तेव्हा संपूर्ण परिसर घोषणाणे दणाणून गेला होता. यावेळी पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक विनायक माहुरकर, श्री. तिळेकर आदी यावेळी उपस्थित होते.