करमाळा (सोलापूर) : अनैतिक संबंधातील श्रावण चव्हाण हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या दोन संशयित आरोपींना करमाळा पोलिसांनी आज (बुधवारी) न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीश बी. ए. भोसले यांनी त्यांना सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला पोलिस ठाण्यात मिसींग दाखल असलेल्या श्रावण चव्हाणची आईबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह मांगी कुकडी कॅनेलजवळ एका कारमध्ये आणून पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी शक्यता आहे. मात्र गाडी जळाली नसल्याने तिसऱ्यादिवशी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तपास करत करमाळा पोलिसांनी संशयित तिघांविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. यामध्ये एका महिलेचाही सामावेश आहे.
गुन्हा दाखल झालेले दोन संशयित हे सख्खे भाऊ आहेत. सुनिल शांताराम घाडगे व राहुल शांताराम घाडगे (दोघे रा. अंदरसूल, ता. येवला, जि. नाशिक) अशी त्यांची नावे आहेत. यामध्ये तिसरा संशयित आरोपी महिला आहे. याचा तपास करण्यासाठी तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मिटू जगदाळे व सरकारी वकील यांनी १० दिवसाची पोलिस कोठडी मागितली होती.
हा खून कधी केला?, कोठे केला? कशाने केला, संशयित महिला आरोपी फरार असून तिला ताब्यात घेणे, कपडे जप्त करणे, मृतदेह कसा आणला? गाडी आतमध्ये कशी पेटवली असा तपास करायचा असून त्यासाठी पोलिस कोठडी मागण्यात आली.
उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरिक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास सुरु आहे. संशयित ताब्यात घेण्यासाठी तातडीने करमाळा पोलिसांचे पथक नाशिक येथे गेले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर, पोलिस हवालदार अजित उबाळे, गणेश शिंदे, तोफीक काझी यांचा या पथकात समावेश होता. खून झालेली व्यक्ती नाशिक जिल्ह्यातील अडसुरेगाव (ता. येवला) येथील आहे. श्रावण रघुनाथ चव्हाण (वय ३९) असे त्याचे नाव आहे. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मिटू जगदाळे हे करत आहेत.