बँक खात्यातून परस्पर साडेसहा लाख काढले! करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : व्हाट्सअपवर आलेल्या लिंकवरील माहिती भरण्यास सांगून बँक बचत खात्यातील ऑनलाइन पद्धतीने 6 लाख 55 हजार 998 रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याप्रकरणात करमाळा पोलिसात अनोळखी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. खात्यावरील १ लाख ५६ हजार त्याशिवाय दुसऱ्यादिवशी पुन्हा एफडी खात्यावर लोन करून ४ लाख ९९ हजार ९९८ रुपये असे ६ लाख ५५ हजार ९९८ रुपये परस्पर काढून फसवणूक झाल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. फुलविक्रेते अंकुश राजेंद्र भानवसे (वय 24, व्यावसाय शेती, रा. गुळसडी) यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे.

भानवसे यांचे ‘बँक ऑफ महाराष्ट्रच्या करमाळा शाखेमध्ये बचत खाते आहे. त्यांनी सात लाख रुपयाची एफडी केली होती. ५ मे रोजी ते गुळसडीत शेतात काम करत होते. तेव्हा त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. ‘मै बँक ऑफ महाराष्ट्र करमाळा शाखा से बँक मॅनेजर बात कर रहा हु। आपकी केवायसी अपडेट नही है, आपके मोबाईल नंबर पे व्हाट्सअप लिंक भेज दी गई है। लिंक ओपन करके उसमे आधार कार्ड क्रमांक, एटीएम नंबर, पिन नंबर, और अकाउंट नंबर डालकर केवायसी अपडेट करो’ असे सांगून फोन कट झाला. त्यांनी सुरुवातीला माहिती भरली नव्हती, परंतु त्यांना वारंवार फोन येऊ लागल्याने त्यांनी खाते लॉक होईल असे सांगू लागल्याने शेतातील काम करून घरी आल्यानंतर व्हाट्सअप वर आलेली लिंक ओपन करून सर्व माहिती ऑनलाईन भरली. त्यानंतर लगेच १ लाख ५६ हजार खात्यातुन डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना आला. त्यानंतर त्यांनी बँक खात्यामधून पैसे डेबिट झाल्याचा संशय आल्याने त्याच दिवशी बँकेत जाऊन माहिती दिली.

त्यांच्या खात्यावर सात लाख रुपयांची एफडी होती. खात्याची माहिती चेक केली तेव्हा खात्यावर 959 रुपये बाकी असल्याचे समजले. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी त्यांना बचत खात्यावर ४ लाख 98 हजार रुपये जमा झाल्याबाबत मोबाईलवर मेसेज आला. त्यानंतर लगेचच खात्यावरून ३ लाख ९९ हजार ९९९ व ९९ हजार रुपये डेबिट झाल्याबाबतचा मेसेज आला. त्यांना पुन्हा संशय आल्याने बँक ऑफ महाराष्ट्र करमाळा शाखेत जाऊन माहिती घेतली. तेव्हा एफडीवर पाच लाख रुपयाचे लोन करून सदरचे रक्कम काढले असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी फसवणूक झाल्याबाबत बँकेत तक्रार दिली. याशिवाय 1930 या क्रमांकावर फोन करून माहिती दिली. यामध्ये ५ जुलैला गुन्हा दाखल झाला असून करमाळा पोलिस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *