‘श्री कमलाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अढथळा ठरणाऱ्या उड्डाण पुलाखालून वाहतूक सुरु करा’

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून श्री देवीचामाळ येथे श्री कमलाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी नऊ दिवस भाविकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर बायपासवरील अडथळा ठरणाऱ्या उड्डाण पुलाखालून राडारोडा काढून वाहतूक सुरु करावी’, अशी मागणी माजी नगरसेवक अतुल फंड यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना केली आहे.

माजी नगरसेवक फंड म्हणाले, ‘श्री कमलाभवानी देवीच्या दर्शनासाठी करमाळा शहरासह तालुका व परिसरातून रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तुळजापूरला ज्योत आणण्यासाठी देखील अनेक भाविक येथून जातात. मात्र बायपासवर पडक्या अवस्थेत असलेला उड्डाण पूल अडथळा ठरत आहे. त्यामुळे लहान मोठे अनेक अपघातही होत आहेत. या पुलाच्या फक्त भिंती राहिल्या असून यातील राडारोडा काढल्यानंतर खालून वाहतूक सुरु करता येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.’

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘या पुलाखाली कमानीच्या बाजूला लोखंड पडलेले आहे. तर करमाळा शहराच्या बाजूला हा पूल पूर्णपणे रिकामा आहे. राडारोडा काढला तर वळसा न घेता सरळ वाहतूक होऊ शकते. दोन्ही बाजूला झेब्रा क्रॉसिंग किंवा गतिरोधक करून येथून वाहतूक सुरु करता येऊ शकते. प्रशासनाने यावर मार्ग काढावा,’ असे माजी नगरसेवक फंड म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *