मुंबई : शिवाजीनगर येथील बस स्थानक विकसित करण्यासाठी महा मेट्रो व राज्य परिवहन महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला होता. त्या अनुषंगाने हे बस स्थानक विकसित होत आहे. याच धर्तीवर स्वारगेट येथील बस स्थानक व मेट्रो स्थानक विकसित करावे, अशा सुचना राज्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केल्या. याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश दिले.
बाधा, वापरा, हस्तांतरण करा यानुसार शिवाजीनगर (पुणे) बसस्थानक विकसित करण्यात आले आहे. याच अनुषंगाने आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी हे काम तात्काळ पुर्ण करण्याबाबत सुचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, असिम गुप्ता, पुणे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर तसेच राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी शिवाजीनगर बस स्थानकाच्या धर्तीवर स्वारगेट येथील बस स्थानक व मेट्रो स्थानक विकसित करण्याबाबत सूचना केल्या. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितद पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्वतः मान्यता दिली. संबंधितांना आठ दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले. ज्याप्रमाणे शिवाजीनगर येथील बस स्थानकात दोन तळघर चारचाकी वाहन बस स्थानकाचा तळमजला व व्यावसायिकसाठी शॉपिंग मॉल आहेत. त्याचप्रमाणे स्वारगेट येथील बस स्थानकात अशा प्रकारच्या सुविधा असाव्यात, अशा सूचना यावेळी राज्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले.
पुणे महा मेट्रो व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ दोघांच्या समन्वयातून ही सुंदर व सर्व सोयींनी युक्त अशी इमारत लवकरच उभी राहील, अशी ग्वाही यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.