करमाळा (अशोक मुरूमकर) : सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यात राजकीय नेते जसे व्यस्त आहेत तसे प्रशासन देखील निवडणूक कामकाजात दंग आहे. याचाच फायदा घेत वाळू माफियांकडून बेकायदा वाळू काढण्याचे काम सुरु होते. मात्र त्यावर आळा घालण्याचे काम कर्तव्यदक्ष तहसीलदार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी केले आहे.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शिल्पा ठोकडे या करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (गुरुवार) सकाळी साधणार साडेसहा वाजताच्या दरम्यान करमाळ्यातून पुण्याला मतपत्रिका आणण्यासाठी जात होत्या. तेव्हा टाकळी चौकात दोन टिपर त्यांना दिसला. तहसीलदार ठोकडे यांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्यात बेकायदा वाळू असल्याचे दिसले. त्याच क्षणी त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली.
तहसीलदार ठोकडे म्हणाल्या, ‘निवडणूक प्रक्रिया सुरु असल्याने प्रशासन निवडणूक प्रक्रियेत व्यस्त आहे. याचा फायदा घेऊन कोणीही बेकायदा कामे करण्याचा प्रयत्न करू नये, असे काम सुरु असल्यास नागरिकांनीही आम्हाला माहिती द्यावी. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे.’ टाकळी चौक येथे दोन वाळू टीपरवर कारवाई झाली. यावेळी तहसीलदार ठोकडे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल श्री. घुगे व तकभाते उपस्थित होते. कारवाई केलेल्या टिपरमध्ये साधारण चार ब्रास वाळू होती.