माळशिरस (सोलापूर) : मारकडवाडी येथे कोणत्याही परिस्थितीत उद्या (मंगळवारी) चाचणी मतदान होणार आहे, असे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी येथे ईव्हीएमवर चुकीचे मतदान झाला असल्याचा संशय नागरिकांना आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र त्याला विरोध केला जात आहे. यावर बोलताना आमदार जानकर म्हणाले, ‘नागरिकांच्या स्वइच्छेने हे चाचणी मतदान होत आहे. त्यांनी ईव्हीएमवर केलेल्या मतदानावर संशय आहे. त्यामुळे हे मतदान होत आहे. कोणत्याही परिस्थितीत येथे मतदान होणार आहे.’
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवायची असतील तर हे मतदान होऊन देणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली जात आहे. मात्र पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करावा. त्यानंतर नागरिकांवर करावा. १० दिवसांपूर्वीच मतदान झाले होते. टक्का दोन टक्का इकडे तिकडे होऊ शकते. पण आमच्यावर अंतरवली सराटी सारखा लाठीचार्ज झाला तरी हे मतदान होणार आहे. हे गाव लढाऊ आहे. अनेक उन्हाळे पावसाळे या गावाने पाहिले आहेत. उत्सुफुर्तपणे हे मतदान होत आहे. त्यामुळे गावाच्या निर्णयाबरोबर मी राहणार आहे. माध्यमांसमोरच हे मतदान होणार आहे’ असे ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून एव्हीएमवर संशय घेतला जात आहे. त्यात मारकडवाडी गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाकडे याबाबत मागणी केली होती. मात्र याला नकार देण्यात आला. त्यानंतर आता येथे मतदान घेण्याबाबत आमदार जानकर यांनी एका माध्यमांशी संवाद साधला.