सोलापूर : ग्रामीण भागातील पंचायत समितीस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेमध्ये कामानिमित्त यायचे असेल तर विभाग प्रमुखांची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिले आहेत. प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी त्यांनी परिपत्रक काढून हा आदेश दिला आहे. सर्व गटविकास अधिकारी व सर्व विभाग प्रमुख यांना यांची माहिती दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी परिपत्रकात म्हटले की, तालुकास्तर कार्यालयातील व क्षेत्रीय कार्यालयातील (जसे पंचायत समिती, पंचायत समिती स्तरावरील उपविभाग, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायत इत्यादी) काही कर्मचारी हे जिल्हा परिषद मुख्यालयास कामानिमित भेट देत असतात परंतू काही कर्मचारी हे कामाशिवाय अनावश्यक व अकारण जिल्हा परिषद मुख्यालयास वारंवार भेट देत आहेत. यामुळे क्षेत्रीय स्तरावरील कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होतो. कार्यालयीन शिस्तीचा भंग होता. तसेच क्षेत्रीय स्तरावरील कर्मचान्यांनी जिल्हा परिषद मुख्यालयांस अकारण, अनावश्यक व अवाजवी भेट दिल्याने मुख्यालयातील कर्मचान्यांचा कार्यालयीन वेळेचा अपव्यय होतो व कामात अडथळा निर्माण होतो. सदरची बाब ही गंभीर असून प्रशासकीय शिस्तीचा भंग करणारी व प्रशासकीय कामांना बाधा आणणारी आहे.
जिल्हा परिषद, सोलापूर अधिनस्त सर्व गट विकास अधिकारी, तालुकास्तरीय विभाग प्रमुख, व क्षेत्रय स्तरावरील कार्यालय प्रमुख यांना याद्वारे सुचित करणेत येते की, आपले अधिनस्त कर्मचारी हे अनावश्यक अवाजवीरीत्या जिल्हा परिषद मुख्यालयांस भेट देणार नाहीत याची दक्षता घ्यावी. ज्या कर्मचान्यांना तातडीच्या कामासाठी जिल्हा परिषद मुख्यालयास भेट दयावयाची असे त्यांनी कार्यालय प्रमुखांची रितसर लेखी परवानगी घेवूनच जिल्हा परिषद मुख्यालयास भेट द्यावी. वैयक्तीक कामासाठी कर्मचाऱ्यांना मुख्यालयास भेट द्यावयाची असल्यास रितसर रजा घेवूनच भेट द्यावी. विभाग प्रमुख यांनी आपले विभागास भेट देणारे कर्मचारी हे रितसर कार्यालय प्रमुखांची परवानगी घेवून किंवा रजा नोंदवून आले आहेत काय याबाबत आपले विभागाच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी/कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांचेमार्फत खात्री करावी. अनावश्यक व अवाजवीरीतीने भेट देत असल्यास संबंधितांची त्या दिवसाची विनावेतनी असाधारण रजा करणेबाबतची एखादा कर्मचारी कार्यवाही संबंधित विभाग प्रमुखांनी करावी. सदरचे परिपत्रक सर्व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी, तालुकास्तर विभागप्रमुख, क्षेत्रीय कार्यायाचे प्रमूख यांनी अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणावे.