करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल हा प्रश्न दिवसेंदिवस संवेदनशील बनत चालला आहे. वेळोवेळी मकाईच्या सत्ताधारी बागल गटाकडून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व तहसीलदार (सध्या शिल्पा ठोकडे व आधी प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव) यांच्या मार्फत आंदोलनकर्त्यांना मुदत दिली जात आहे.
मकाई साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बील न मिळाल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतलेल्या बैठकीत दिलेली तारीख सत्ताधारी बागल गटाकडून तारीख हुकली. त्यानंतर प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलनकर्ते प्रा. रामदास झोळ, शेतकरी संघर्ष समितीचे दशरथ कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऍड. राहुल सावंत यांनी दिला होता. हे आंदोलन करू होऊ नये म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सामूहिक बैठक घेतली होती. या बैठकीला कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर व बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांच्यासह संचालक अमोल यादव उपस्थित होते. मात्र आंदोलनकर्त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवत आज (शुक्रवारी) आंदोलन करण्यावर ठाम होते. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीला मात्र ते उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनी सामूहिक आंदोलन होणार आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन ऍक्शन मूडवर होते. तहसीलदार ठोकडे यांनी काही दिवसांपूर्वीच पदभार घेतला आहे. तर घुगे यांचा तर पदभार घेतलेला आज तिसरा दिवस होता. अशा स्थितीत आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र ते आंदोलनावर ठाम होते. प्रशासनने तहसील कार्यालय परिसरात अग्निशमन गाडी व रुग्णवाहिका तैनात केल्या होत्या. तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमाला येणार्यालाही प्रवेशद्वारात तपासणी करून सोडले जात होते.
न्यायालयाकडील बाजूला, मुख्य प्रवेशद्वार व कोषागार कार्यालयाकडील प्रवेशद्वारात पोलिस तैनात केले होते. एकही गाडी आतमध्ये सोडली जात नव्हती. यावेळी दंगाकाबू पथक देखील बोलावण्यात आले होते. याबरोबर सर्व पेट्रोलपंपावर बाटलीत पेट्रोल देण्यासही बंदी घालण्यात आली होती. (कायद्याने बाटलीत पेट्रोल देणे बंदीच आहे. मात्र ग्रामीण भागात नागरिकांच्या सोईसाठी पेट्रोल दिले जाते.) आंदोलकांना पोलिसांकडून समजूत घातली जात होती. आज आंदोलनात बिटरगाव श्री, तरटगाव व अंजनडोहसह परिसरातील काही महिलाही उपस्थित होत्या.
आंदोलकांना पोलिस निरीक्षक घुगे यांनी सुरुवातीला तहसीलदार ठोकडे यांच्या दालनात चर्चा करायला येण्याची विनंती केली. मात्र आम्ही आत चर्चा करणार नाही जी चर्चा करायची ती सर्वांसमोर करायची असे म्हणत ते ठाम राहिले. मात्र काहीवेळातच ठोकडे या आंदोलकांसमोर आल्या आणि त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर काही वेळातच ठोकडे त्यांच्या कक्षात गेल्या त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व घुगे यांच्यात काहीवेळ चर्चा झाली. दरम्यान मकाई कारखान्याचे कर्मचारीही तेथे आले. त्यानंतर आंदोलकांचे एक शिष्टमंडळ ठोकडे यांच्या कक्षात आले आणि त्यांच्यात चर्चा झाली. तेथे चर्चा करून ठोकडे, पाटील व घुगे हे आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ हे आंदोलनकऱ्यांसमोर आले आणि. कारखान्याने दिलेले पत्र देत आदोंलन स्थगित केले. दरम्यान, ठोकडे, पाटील व घुगे यांची मध्यस्थी यशस्वी झाली. मात्र ३१ तरखेपर्यंत पैसे मिळाले नाही तर पुन्हा आंदोलनाला समोर जावे लागणार अशी शक्यता आहे.