करमाळा (अशोक मुरूमकर) : महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समोरच्या उमेदवाराचे आणि करमाळा तालुक्याचे संबंध सर्वांना माहित आहेत. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीवेळी त्यांना त्यांची जागा दाखवली होती. ३० ते ४० वर्षात त्यांनी कसा विकास केला आणि संस्थांचे कामकाज कसे केले हे आपणास माहित आहे, असे म्हणत आमदार संजयमामा शिंदे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मोहिते पाटील यांना टोला लगावला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज (सोमवारी) सावडीत पहिला कॉर्नर सभा झाली आहे. या सभेसाठी सावडीसह केत्तूर, कोंढारचिंचोली, कोर्टी, हिंगणी, देलवडी, पारेवाडी, दिवेगव्हाण आदी ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत. आमदार संजयमामा शिंदे, बागल गट, जगताप गटासह महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), रासप, रयत क्रांती व आरपीआय (ए) पदाधिकारी उपस्थित होते.
‘खासदार निंबाळकर यांनी केंद्रातील योजना आणण्यासाठी काम केले आहे. तालुक्याचे अनेक महत्वाचे विषय होते, ते सोडवण्यासाठी मीही प्रयत्न केला आहे, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे. आमदार शिंदे म्हणाले, प्रकल्पातील भूसंपादनाचे पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि ते मिळाले आहेत. तालुक्यातील विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत. पर्यटन, समाज कल्याण विभाग, क्रीडा व कृषी भागातून आपल्याला निधी मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून जातेगाव- टेंभुर्णी या महामार्गाचे काम आपण मार्गी लावले आहे, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.