करमाळा (अशोक मुरूमकर) : पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही विवाह लावून दिल्याप्रकरणी आई- वडिलांसह चौघांवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा तालुक्यातील गौन्डरे येथे हा बालविवाह झाला होता. सुमारे अडीच वर्षांनी हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात संबंधित बालविवाह करणाऱ्यासह पीडितीतेचे आई- वडील व बालविवाह करणाऱ्याच्या आई- वडिलांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी बापू दौन्डे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
गौन्डरे येथील मंदिरात पीडित अल्पवयीन मुलीचा मे २०२३ मध्ये विवाह झाला होता. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात याप्रकरणात २०२३ मध्ये 363 व 370 सह पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होता. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांच्याकडे होता. त्या जबाबात पीडित अल्पवयीन मुलीने गौन्डरे येथील विवाहाची माहिती दिली. याबाबत करमाळा पोलिस ठाण्यातील पोलिस हेडकॉन्स्टेबल मयूर गव्हाणे यांनी बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी दौन्डे यांना २ सप्टेंबर २०२५ रोजी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी बालविवाह प्रतिबंध समिती व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून फिर्याद दिली. यामध्ये पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही विवाह लावून दिल्यामुळे तिचे आई- वडील (रा. चोंभेपिंपरी, ता. माढा) व विवाह करणाऱ्यासह त्याचे आई- वडील (रा. म्हैसगाव, ता. माढा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही संगनमताने नातेवाईकांनी विवाह केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.