करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक बागल व पाटील एकत्र येणार अशी सध्या सर्वत्र चर्चा आहे. मात्र याबाबत गटाच्या प्रमुखांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. हे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा असली तरी ते एकत्र कसे येतील आणि त्यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सध्या जगताप गटाला चांगले वातावरण आहे अशी चर्चा आहे. मात्र जगताप गटाच्याविरुद्ध बागल व पाटील हे एकत्र येऊन निवडणुकीत उतरले तर काय होईल हे पहावे लागणार आहे. सध्य स्थितीत सावंत गटाची एक व जगताप गटाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. १५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. जगताप गटाला रोखायचे असेल तर बागल आणि पाटील एकत्र येऊन रणनीती आखली जाईल, अशी शक्यता आहे. जगताप गटाला शिंदे गटाचे सहकार्य असेल हे खरे असले तरी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचेही अर्ज दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्यातही जागा वाटपाचा मुद्दा निर्माण होण्याची शक्यता आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ संचालकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये ग्रामपंचायत मतदार संघात चार व सहकारी संस्था मतदारसंघात ११ जागा आहेत. काहीही करून बाजार समितीत विजयी मिळवायचा यासाठी जगताप गटाची तालुक्यातील सोसाट्याच्या निवडणुकीपासूनच तयारी सुरु होती. तेव्हा मात्र पाटील आणि बागल गटाचे पाहिजे तेवढे लक्ष नव्हते. सध्य स्थितीत जगताप, पाटील, शिंदे व बागल हे गट स्वतंत्र लढले तर डोळे झाकून बाजार समिती जगताप गटाच्या ताब्यात जाईल, अशी शक्यता जगताप गटाचे कार्यकर्ते वर्तवत आहेत, अशा स्थितीत बागल आणि पाटील एकत्र आले तर काय होईल हे पहावे लागणार आहे.
बागल व पाटील गटाची युती होणार असा विश्वास दोन्ही गटाचे अनेक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. मात्र या युतीत मोहिते पाटील गट व भाजपलाही काही जागा दिल्या जाणार का? असा प्रश्न आहे. २६ तरखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. १५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. येणारी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीची सर्वात निवडणूक म्हणून या निवडणुकीला विशेष महत्व आहे.