करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुदत संपलेल्या या ग्रामपंचायीतवर सध्या प्रशासक नियुक्त आहेत. तेथे आता आरक्षण सोडतीच्या कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार बुधवारी (२१ जूनला) विशेष ग्रामसभा होणार आहे. त्यानुसार आरक्षण सोडत होणार आहे.
करमाळा तालुक्यातील भगतवाडी, जेऊर, राजुरी, चिखलठाण, गौडरे, उंदरगाव, कंदर, कोर्टी, निंभोरे, केत्तूर, वीट, रामवाडी, घोटी, रावगाव, कावळवाडी व केम या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे. तेथे सध्या प्रशासक कारभार पाहत आहेत. या ठिकाणी निवडणुका घेण्यासाठी प्रभाग रचनेनुसार विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत होणार आहे.
तहसीलदार यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत ही ग्रामसभा होणार असून यामध्ये अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला असे आरक्षण सोडत होणार आहे. आरक्षण सोडतीनंतर गुरुवारी (ता. २२) प्रभागनिहाय प्रारूप प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यावर शुक्रवारी (ता. २३) ते शुक्रवारपर्यंत (ता. ३०) पर्यंत हरकती व सूचना घेता येणार आहेत. या हरकतीवर ६ जुलैला उपविभागीय अधिकारी निकाल देणार आहेत. १४ जुलैला जिल्हाधीकारी यांच्या आदेशाने अंतिम आरक्षण प्रसिद्ध होणार आहे.