Therefore Kolgaon Dam was shifted otherwise Jamkhed would have gone under the water

करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर व धारशीव जिल्ह्याच्या सीमेवर असलेले सीना नदीवरील कोळगाव धरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. या धरणाचा जास्तीतजास्त फायदा व्हावा व बाधित क्षेत्र कमी व्हावे म्हणून या धरणाची जागा बदलण्यात आली होती. आता करमाळा तालुक्यातील कोळगाव व परांडा तालुक्यातील डोमगाव दरम्यान हे धरण आहे, मात्र या धरणाची जागा दुसरीकडे होती. जागा बदलण्यापूर्वी निश्चित झालेली जागा ठेवली असती तर नगर जिल्ह्यातील जामखेडच्या बाजारापर्यंत पाणी गेले असते, असा दावा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केला आहे.

भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यात उजनी व सीना नदीवर कोळगाव हे धरण आहे. या धरणाचा फायदा धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील गावांना होतो. उजनी धरणाची जागा बदलण्यास स्व. नामदेवराव जगताप हे कारणीभूत होते तर कोळगाव धरणाची जागा बदलण्यास त्यांचे चिरंजीव माजी आमदार जयवंतराव जगताप हे कारणीभूत आहेत. या धरणाची जागा का बदलण्यात आली आणि जिल्ह्याच्या विकासात कसा वाटा आहे हे माजी आमदार जगताप यांनी जाहीरपणे आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितील कार्यक्रमात सांगितले आहे.

माजी आमदार जगताप म्हणाले, ‘स्व. नामदेवराव जगताप हे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते. राजकारण न करता विकासाची कामे करण्यावर त्यांचा भर होता. सोलापूर जिल्ह्याला जास्तीतजास्त फायदा व्हावा म्हणून त्यांनी जागा बदलली होती. त्याप्रमाणेच सीना नदीवरील कोळगाव धरणाची जागा बदलण्यासाठी मी पुढाकार घेतला होता.’ ते म्हणाले, ‘सीना कोळगाव हे धरण पूर्वी पोटेगाव येथे होणार होते. तेव्हा हेलिकॅप्टरमधून याचा सर्व्हे झाला होता. तेथे धरण झाले असते तर करमाळा तालुक्यातील बाळेवाडी, पोटेगाव, बिटरगाव श्री, तरटगाव, आळजापूर, खडकी आदी गावे बाधित झाली असती तर नगर जिल्ह्यातील ही गावे बाधित झाली असती. या धरणाचे पाणी जामखेड येथील बाजापर्यंत जात होते, असे अहवाल देण्यात आला होता. मात्र तालुक्याचे होणारे नुकसान आणि मिळणार लाभ याची तुलना केल्यानंतर ही जागा बदलण्याची मागणी झाली.’ (Therefore Kolgaon Dam was shifted otherwise Jamkhed would have gone under the water)

पुढे बोलताना जगताप म्हणाले, ‘बिटरगाव श्री येथील नामदेवराव जगताप यांचे सहकारी स्व. भगवानराव शिंदे व भागवत नलवडे यांनी पुढाकार घेत ही जागा बदलण्यासाठी जनजागृती केली. त्यानंतर आम्ही नागपूर येथे तत्कालीन मंत्री निलंगेकर व निंबाळकर यांची भेट घेतली होती. तेव्हा मंत्र्यांना थेट भेटता येत होते. आताच्याप्रमाणे परवानगीची गरज नव्हती. एका रूममध्ये आम्ही तेथे मुक्काम केला होता. मात्र तेथून धरणाची जागाच बदलून आलो होतो. ही जागा बदलल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील व धाराशिव जिल्ह्यातील गावांना फायदा झाला.’

धरणाविषयी थोडक्यात माहिती
सीना कोळगाव हे धरण भीमा नदीची उपनदी असलेल्या सीना नदीवर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर आहे. सोलापूरपासून १०८ तर धाराशिवपासून साधारण ७५ किलोमीटरवर हे धरण आहे. २००७ मध्ये पूर्ण झालेल्या या धरणाची उंची ३६. ६ मीटर म्हणजे १२० फूट आहे. या धरणाची लांबी २०४० मीटर म्हणजे ६६९२ फूट आहे. या धरणाची पाणी क्षमता ५.३१ टीएमसी म्हणजेच ५३१० दशलक्ष घनफूट आहे. तर उपयुक्त पाणीसाठा क्षमता २.६९ टीएमसी आहे. या धरणाला २१ दरवाजे आहेत. राज्यातील सर्वात मोठा जलसाठा असलेल्या धरणाच्या यादीत याचा ६१ वा क्रमांक आहे. तर उपयुक्त पाणीसाठाच्या यादीत ८६ वा क्रमांक आहे. या धरणात परांडा तालुक्यातील डोमगाव येथे कल्याणस्वामी महाराजांचा मठ आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *