करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिदू मानला जात असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सल्लागारपद आज (बुधवारी) तिघांनी नाकारले आहे. ‘कारखाना अडचणीत आल्यानंतर शेवटच्याक्षणी आम्हाला सल्लागार नेमले आहे’, असा आरोप त्यांनी केला आहे. आदिनाथला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी निवडणूक घेऊन सक्षम संचालक मंडळ देणे हाच पर्याय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
आदिनाथ कारखान्यावर सल्लागार म्हणून प्रशासक बाळासाहेब बेंद्रे यांनी माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे, केमचे अच्युत तळेकर पाटील, धुळाभाऊ कोकरे व डॉ. वसंत पुंडे यांची नेमणूक केली होती. प्रशासकीय सदस्य महेश चिवटे व संजय गुटाळ यांच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार या नेमणुका झाल्या होत्या. त्यानंतर पहिल्यादाच सल्लागार समितीची कारखान्यावर ही बैठक झाली. बेंद्रे यांच्यासह चिवटे, गलांडे व कोकरे या बैठकीला नव्हते.
आदिनाथ कारखान्यावर काही सभासद, कामगार व कारखाना प्रशासन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत डांगे, डॉ. पुंडे व पाटील यांनी सल्लागार पद नाकारले आहे. बैठकीला कारखान्याचे कार्यकारी संचालक अरुण बागनवर, प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे यांच्यासह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला काही काही सभासद व कामगारांनी मनोगत व्यक्त केले. बागनवर यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या अडचणी सांगितल्या. अडचणीतून कारखाना बाहेर काढण्यासाठी मंत्री सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कसा प्रयत्न झाला हे गुटाळ यांनी सांगितले.
डांगे म्हणाले, ‘आम्हाला कारखान्यावर आता सल्लागार नेमून काय उपयोग होणार आहे का? आम्हाला आता काम करण्याची इच्छाही नाही. कारखाना व्यवस्थित चालावा असे वाटत असेल तर निवडणूक घेणेच आवश्यक आहे. कारखाना व्यवस्थित सुरु करण्यासाठी आधी सहा महिने तयारी करावी लागते. आमच्या हातात जादूची कांडी नाही. कारखाना अशा परिस्थितीत चालवून नुकसान करू नये. कारखाना नुकसानीत चालवून सभासदांचे नुकसान करू नये. यावर्षी कारखाना सुरु करण्याची परस्थिती नव्हती. कारखान्याचे मालक जे आहेत त्यांना काय करायचे ते ठरवू द्या. प्रशासक नेमून सरकार फेल गेले आहे, हे यावरून सिद्ध होते. बाजार समितीप्रमाणे कारखाना बिनविरोध करून कारखाना अडचणीतून बाहेर काढावा.’ डांगे यांनी सल्लागार पद नाकरताच डॉ. पुंडे व पाटील यांनीही आपण पद नाकारत असल्याचे जाहीर केले.