करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची निवडणूक होत आहे. यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा झाल्यानंतर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्याने वातावरणात बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात खरी लढत होत आहे. वंचितचे रमेश बारस्कर हे देखली येथे उमेदवार आहेत. यामध्ये निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली असल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या या मतदारसंघात दिवसात तीन सभा झाल्या होत्या. त्यानंतर लगेच पंतप्रधान मोदी यांची सभा झाली. फक्त ही सभाच झाली नाही तर मोठे शक्तिप्रदर्शनही करण्यात आले आहे. त्यामुळे निंबाळकरांचे नक्कीच वातावरण बदलेल अशी चर्चा सुरु झाली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात निंबाळकर यांची पहिल्याच यादीत भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली होती. त्यानंतर मोहिते पाटील समर्थक नाराज झाले होते. त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्नही झाले होते. अशा स्थितीतही निंबाळकर यांचा प्रचार सुरु होता. करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, आमदार जयकुमार गोरे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे सुरुवातीपासूनच महायुतीच्या उमेदवाराला बळ होते. भाजपने निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने ते बळ आणखी वाढले आहे. जिल्ह्यात शिंदे विरुद्ध मोहिते पाटील यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरु आहे. त्यात मोहिते पाटील हेच स्वतः उमेदवार असल्याने शिंदे बंधूनी पूर्ण ताकद निंबाळकर यांच्या पाठीशी लावलेली आहे.
आमदार यांनी संपुर्ण मतदारसंघावर बारकाईने लक्ष दिले असून कार्यकर्त्यांची भेट घेऊन मोहिते पाटील यांना मताधिक्य देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान महायुतीमधील आरपीआय, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचेही बळ निंबाळकरांना मिळत आहे. याशिवाय कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून स्वतः फडणवीस यांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. ‘मीडियाने ही निवडणूक चुरशीची आहे, असे म्हटले आहे. मात्र आम्हाला या निवडणुकीत निंबाळकर हे विजयी होतील, अशी खात्री आहे,’ असे जाहीरपणे अकलूज येथील सभेत म्हटले होते. फडणवीस यांचे हे विधान कार्यकर्त्यांना बळ देणारे आहे. त्यानंतर याच मतदारसंघात मोहिते पाटील यांच्या ‘होमपीचवर’ म्हणजे माळशिरसमध्ये भाजपने पंतप्रधान मोदींची सभा घेतली.
मोदींच्या सभेसाठी माढा लोकसभा मतदारसंघातील माण, फलठण, सांगोला, माळशिरस, माढा व करमाळा मतदारसंघातुन शक्तिप्रदर्शन झाले होते. आम्ही सर्व निंबाळकरांबरोबर असल्याचे यावेळी दाखवून देण्यात आले. निंबाळकर यांनी सुरुवातीपासून रेल्वे थांबा, सिंचन प्रकल्प, वीज यासह मोदी यांनी राबवलेल्या कृषी योजना यावर भर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून निंबाळकर यांच्याबाबत असलेली नकारात्मकता मोदींच्या सभेमुळे दूर होण्याचा यामुळे प्रयत्न होऊ शकणार आहे.
करमाळा तालुक्यातून माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गटाने त्यांना पाठींबा दिला आहे. त्यांचाही फायदा निंबाळकरांना होणार आहे.
या आहेत जमेच्या बाजू
- माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन योजना मार्गी लावल्याचा फायदा होणार
- आमदार शिंदे व निंबाळकर हे गेल्यावेळी एकमेकांच्या विरोधात लढले असले तरी विकास कामासाठी केलेले एकत्र काम
- आमदार बबनदादा शिंदे, दीपकआबा साळुंके, रश्मी बागल हे निंबाळकरांबरोबर आहेत.
- करमाळा तालुक्यात मध्य रेल्वेच्या स्थानकानावर दिलेले रेल्वे थांबे
- करमाळा तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न
- करमाळा तालुक्यातील ४० गावांच्या पाणी प्रश्नासाठी दिलेले आश्वासन
- कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेबाबत (फ्लड डायवेशन) काम
- रस्ते, पाणी व विजेच्या पाणी प्रश्नाबाबतचे काम