ज्येष्ठ साहित्यिक अरुण खोरे यांना साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पुणे : ‘देशात सर्वत्र आपल्याला आरक्षण मिळाले पाहिजे ही भावना काही वर्षांपासून वाढत आहे. दुसरीकडे सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत, तसेच आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय म्हणजे एकाच प्रवर्गात असंतोष वाढीस लागू शकतो. यामुळे मूळ प्रश्न सुटणार नाहीत. खासगी क्षेत्रात आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी संविधानिक मार्गाने जनआंदोलन उभे राहण्याची गरज असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांनी व्यक्त केले.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने बोपोडीतील सम्यक विहार विकास केंद्रच्या वतीने ‘साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार अरुण खोरे यांना ज्येष्ठ साहित्यिक माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. खरे बोलत होते. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनवणे, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम, ऍड. ज्ञानेश्वर जावीर, समितीचे सचिव दीपक म्हस्के आदी उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, शाल, मानपत्र व रोख ११ हजार असे होते.

डॉ. विजय खरे म्हणाले, ‘अलीकडे समाजा समाजात वाढत असलेला उच्चकोटीचा द्वेष चिंताजनक आहे. आरक्षण हा सामजिक न्याय देण्याचा मार्ग आहे. एकाच प्रवर्गाचे वर्गीकरण करणे जातीय हिंसेला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. यामुळे त्या ऐवजी ज्या खासगी क्षेत्रात आज नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत त्या क्षेत्रात आरक्षण मिळाले पाहिजे आणि ही जनतेच्या आंदोलनाशिवाय मिळणार नाही, समाजातील वंचित, मागासवर्गीय घटकांचे अस्तित्व टिकवायचे असेल तर हे होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.’

डॉ. सबनीस म्हणाले, ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे समजून घेण्याची आज गरज आहे. काही जातियवादी शक्ती आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी समाजात असंतोष वाढीस लागावा असे धोरण राबवत आहेत, त्याला उत्तर देण्यासाठी अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. अण्णा भाऊ कामगार नेते होते मार ते कम्युनिस्टांचा कडव्या छावणीत रमले नाहीत, त्यांनी बाबासाहेबांचा विचार जपत आपली वाटचाल केल्याचे स्पष्टपणे दिसते. मातंग समाजाला आपली प्रगती करायची असेल तर त्यांनी अण्णा भाऊ साठे सारखे बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्याची आज गरज आहे. त्याशिवाय त्यांची उन्नती होणार नाही हे वास्तव आहे. काही सनातनी हिंदू मातंग आणि बौद्ध समाजात दुही निर्माण करण्यात अग्रेसर आहेत, परंतु खरे हिंदुत्व हे समाजात फूट पडणारे नसते जे खरे हिंदुत्व हे समाजाला जोडणारे आहे.’

अरुण खोरे म्हणाले, ‘महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याऐवजी आज त्यांना स्मारकांच्या जागे पर्यंत मर्यादित करण्याचे काम दुर्दैवाने सुरू आहे. महापुरुषांची छोटी छोटी स्मारके करण्याऐवजी राष्ट्रीय स्मारके निर्माण झाली पाहिजेत. त्याशिवाय त्यांचे योगदान आणि विचार आजच्या पिढीला समजणार नाहीत. आज मातंग समाज आणि बौद्ध समाज एकत्र येण्याची आवश्यकता आहे, अण्णाभाऊ साठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील सभांना उपस्थित असायचे , यातून त्यांची जडण घडण झाली आहे हे वास्तव समाजासमोर आले पाहिजे, शाहीर, साहित्यिक, कामगार नेते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते झाले ते बाबासाहेब आंबेडकर यांना गुरुस्थानी मानायचे. आज मातंग आणि बौद्ध समाजाच्या एकीकरणासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राज्यस्तरीय परिषद घ्यावी’, अशी सूचनाही खोरे यांनी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना परशुराम वाडेकर म्हणाले, ‘आज मागासवर्गीय समाजात जाती पातीचे राजकारण सुरू झाले आहे, हे चित्र अत्यंत विदारक आहे, आम्ही पँथरच्या चळवळीत घडलो त्यात आम्हाला कधी हा कार्यकर्ता मातंग, चर्मकार आहे असे कधी वाटले नाही आज मात्र हे चित्र बदलले आहे, मागील 10 – 15 वर्षात हे अधिक प्रकर्षाने झालेले दिसून येते, हे चित्र बदलण्यासाठी मातंग आणि बौद्ध समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता आहे. बहुजन समाजाने स्वतःच्या जातीचे न होता, जातीय राजकारण न करता संपूर्ण समाजाचे झाले पाहिजे, महापुरुषांचे विचार आचरणात आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत,’ असेही त्यांनी म्हटले.

अंकल सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून अण्णा भाऊ साठे आणि बाबासाहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले तर आभार सुनीता वाडेकर यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात अंध कलावंतांच्या सूर संगम गायन पार्टी च्या प्रबोधनात्मक गाण्यांच्या कार्यक्रमाणे झाली. तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *