पालखीमार्गावरून (अशोक मुरूमकर) : माऊली माऊलीचा जयघोष अन भांडाऱ्याची उधळण करत डुकरेवाडीत (सोलापूर जिल्हा, करमाळा रावगाव येथे) मानाच्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे आज (बुधवारी) स्वागत झाले. जेसीबी आणि जिल्हाहद्दच्या कमानीवरुन या पालखीवर पृष्पवृष्ठी करण्यात आली. यावेळी वारकऱ्यांना रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर रावगाव येथे मुक्कामासाठी पालखी सोहळा विसावला. यावेळी विठूनामाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.
सोलापूर व नगर जिल्ह्याच्या हद्दीवर शेगुड व डुकरेवाडी येथे ग्रामस्थ व जिल्हा प्रशासनाने पालखीचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कार्याधिकारी यशवंत माने, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, गटविकास अधिकारी मनोज राऊत, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, संतोष गोसावी यांच्यासह रावगावसह परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
डुकरेवाडी येथील स्वागतानंतर साधारण चार किलोमीटरवर रावगावमध्ये पालखी सोहळा पालखी स्थळावर विसवला. पालखी सोहळा ट्रस्टचे अध्यक्ष निलेश गाडवे यांच्याकडील माहितीनुसार रथापुढे चार व रथाच्या मागे ४१ अशा ४५ दिंड्यांमधून साधारण ५० हजार वारकरी या पालखी सोहळ्यात आहेत. यामध्ये महिला व युवक वारकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.
मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी प्रशासनाने व्यवस्था केली आहे. महिलांसाठी विसावा शेड, ठिकठिकाणी प्लास्टीक संकलन केंद्र उभारले आहेत. महावितरणकडून विजे नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. उपकार्यकारी अधिकारी सुमित जाधव यांच्यासह त्यांचे संपूर्ण पथक पालखी सोहळ्यासाठी लक्ष ठेऊन आहेत. वारकऱ्यांनी पालखी सोहळ्यातील दैंनदिन कार्यक्रम घेतले. त्यानंतर ठिकठिकाणी महिला व पुरुष वारकरी हरिनामाचा जयघोष करत असताना दिसले.
रामदास झोळ फाऊंडेशनकडून टँकरची व्यवस्था
रावगाव येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या मुहूर्तावर रामदास झोळ फाऊंडेशनकडून पाण्याचा टँकर देण्यात आला आहे. या टॅंकरचे उदघाटन आज रावगाव ग्रामपंचायत येथे करण्यात आले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, रावगाव येथील ग्रामस्थ व वारकरी उपस्थित होते.
रावगावला यात्रेचे स्वरूप
श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे रावगाव येथे आगमन झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी अनेक विक्रेत्यांची दुकाने थाटली होती. लहान मुलांचे पाळणे आणि खाऊची दुकाने यामुळे रावगावला यात्रेचे स्वरूप आले होते.