Candidate 44 applications filed for Karmala Assembly

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीसाठी करमाळा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 4 हजार 737 मतदान वाढले आहे. या वाढलेल्या मतांचा फायदा कोणाला होणार आहे हे पहावे लागणार आहे.

करमाळा मतदारसंघात आमदार संजयमामा शिंदे यांचा शिंदे गट, माजी आमदार नारायण पाटील यांचा पाटील गट, बागल व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा जगताप गट हे प्रमुख गट आहेत. पक्षापेक्षा येथे स्थानिक गटांमध्ये नेहमीच चुरशीचा सामना होताना दिसतो. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच गटांची रणनीती सुरु आहे. त्यात शिंदे व पाटील यांच्यात प्रमुख लढत होईल, असे बोलले जात आहे. या निवडणुकीत बागल गट देखील उतरणार असून त्यांचे संपूर्ण मतदारसंघात दौरे सुरु आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीचा विचार केला तर येथे महायुतीमधील घटक पक्ष असलेला भाजपकडून रश्मी बागल या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यात भाजपचे नेते गणेश चिवटे यांनीही शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून तालुक्यात दौरा सुरु करून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यांचे कार्यकर्ते देखील उमेदवारीसाठी आग्रही आहेत. काहीही करून त्यांनी विधानसभेसाठी रिंगणात उतरले पाहिजे आणि वरिष्ठांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. दुसरीकडे शिवसेना (शिंदे) जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनीही येथील जागेसाठी दावा केला आहे. येथील आमदार संजयमामा शिंदे हे अपक्ष आहेत. मात्र ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानतात. त्यामुळे राष्ट्रवादीची (अजित पवार गट) उमेदवारी त्यांना मिळणार का हे पहावे लागणार आहे. शिंदे यांचे अनेक कार्यकर्ते पुन्हा अपक्ष उतरण्याचा आग्रह धरत आहेत. त्यामुळे येथे उमेदवारी कोणाला मिळणार हे पहावे लागणार आहे.

महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार नारायण पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे. येथे तालुकाध्यक्ष संतोष वारे व बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्याही भूमिका महत्वाच्या मानल्या जात आहेत. मोहिते पाटील समर्थक यांचाही भूमिका महत्वाची ठरणार आहे. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) काय भूमिका घेतली त्यावर अनेक गणिते अवलंबून आहेत. मनोज जरांगे यांनी येथे उमेदवार दिला तर तो कोणाची मते घेईल हे पहावे लागणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त ५ हजार ४९४ मताधिक्याने शिंदे विजयी झाले होते. त्यांना 78 हजार 822 मते होती. माजी आमदार नारायण पाटील यांना 73 हजार 328 मते तर रश्मी बागल यांना 53 हजार 295 मते होती. माजी आमदार जगताप यांचा शिंदे यांना पाठींबा होता. आता शिंदे गटाचेही गावागावात कार्यकर्ते तयार झाले आहेत ही शिंदे गटासाठी जमेची बाजू आहे. कारखान्यांमुळे बागल गटाला फटका बसला आहे. या निवडणुकीत वाढीव मतांचा आता कोणाला फायदा होणार हे पहावे लागणार आहे.

करमाळा मतदारसंघात 3 लाख 24 हजार 35 मतदान आहे. यामध्ये 1 लाख 69 हजार 390 पुरुष, 1 लाख 54 हजार 633 महिला व 12 तर मतदान आहे. यामध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 4 हजार 737 मतदारांची वाढ झाली. या निवडणुकीसाठी 347 मतदान केंद्र आहेत.

२०१९ करमाळा विधानसभा मतदारसंघ निकाल
आमदार संजयमामा शिंदे : 78 हजार 822 मते (5 हजार 494 मताधिक्य)
माजी आमदार नारायण पाटील : 73 हजार 328 मते
रश्मी बागल : 53 हजार 295 मते

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *