करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज (सोमवारी) जाहीर झाले आहेत. या निकालानंतर प्रमुख गटांच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून दावे- प्रतिदावे सुरु झाले आहेत. असे असले तरी केम व गौडरेवर मात्र आश्चर्यकारक निकाल असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी सरपंच एकाच तर सदस्य मात्र दुसरेच आले आहेत.
तालुक्यात १५ ग्रामपंचायतीसाठी अतिशय चुरशीने मतदान झाले होते. अनेक ठिकाणी क्रॉस वोटिंगचा फटका पॅनलला बसला आहे. केममध्ये मोहिते पाटील समर्थक अजित तळेकर यांच्या पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाय सात जागा आल्या आहेत. मात्र विरोधी गटाच्या १० जागा आल्या आहेत. त्यामुळे १० सदस्यांचाही येथे होल्ड राहणार असल्याचे बोलले जात आहे. येथे एक सरपंच व १७ सदस्यासाठी ही निवडणूक झाली. यामध्ये अजित तळेकर यांच्या पॅनलच्या सात जागा व एक सरपंच विजयी झाले आहेत. तर विरोधी गटाच्या १० जागा आहेत.
गौडरे येथे शिंदे गटाच्या तारामती हानपुडे या सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. मात्र येथे सदस्य पाटील गटाचे जास्त आहेत. येथे नऊ सदस्य व एक सरपंचपदासाठी निवडणूक झाली. त्यात पाटील गटाच्या सहा जागा आहेत. तर इतर तीन जागा आहेत. त्यामुळे येथेही सदस्यांचा होल्ड राहणार आहे.
कावळवाडीत चिट्टीवर एक जागा विजयी
कावळवाडीत सात सदस्य व एक सरपंच पदासाठी निवडणूक झाली. येथे रामभाऊ हाके यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पाटील व बागल एकत्र आले होते. बागल व पाटील गटाचे येथे सरपंच विजयी झाले आहेत. त्याबरोबर पाच सदस्य विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक एकमध्ये आशा शेजाळ व कलावती शेजाळ यांना १४१ अशी समान मते पडली. त्यात चिट्टीद्वारे कलावती शेजाळ या विजयी झाल्या आहेत.