करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला आठवड्यात दोनवेळा महापूर आला आणि शेतीचे प्रचंड नुकसान करून गेला. यात शेतकऱ्यांचे ज्या बंधाऱ्यावर भविष्य अवलंबून आहे ते दोन बंधारे वाहून गेले. त्यात बाजूची शेतीसुद्धा खडकापर्यंत वाहून गेली. याला फक्त पाटबंधारे विभागाचे बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचारी कारणीभूत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई होत नसल्याने त्यांना नेमका कोणाचा अभय आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
१) करमाळा तालुक्यातील खडकी येथे कोल्हापूर पद्धतीचा पाठबंधारा आहे. या बंधाऱ्यावर येथील शेती अवलंबून आहे. उन्हाळा झाला की पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याची दारे काढणे आवश्यक असते. मात्र या बंधाऱ्याची दारेच काढली नाहीत. त्यामुळे महापुरात नदी पात्राच्या बाहेर पाणी पडण्याआधी बंधाऱ्याच्या बाजूने पाण्याला मार्ग मिळाला आणि शेती खरडून वाहून गेली. बंधाऱ्याची दारे काढली असती तर सर्वत्र एकसारखे पाणी पात्रातून वाहून गेले असते. मात्र बंधाऱ्याच्या दारामुळे मागे पाणी अडले आणि प्रचंड वेग असलेल्या बंधाऱ्याने बाजूने मार्ग शोधत शेती वाहून नेली. यामध्ये शेतीचे तर नुकसान झालेच शिवाय जोरपर्यंत बंधारा दुरुस्त होत नाही तोपर्यंत शेतीसाठी पाणी अडले जाणार नाही. हे न भरून येणारे नुकसान आहे. या बंधाऱ्याला भाजपचे जिल्हा सरचिटणीस यांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट दिली.
२) पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पहिला महापूर आला तेव्हा खडकी आणि तरटगाव या बंधाऱ्याला भेट दिली. तरटगाव बंधाऱ्याला पालकमंत्री गोरे यांनी भेट दिली तेव्हा हा बंधारा चांगला होता. मात्र त्यात मोठ्याप्रमाणात फुरसान अडकले होते. बाजूने जमीन खचली होती. मात्र झोपेत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना यातून जाग आली नाही. त्यांनी तत्काळ खचलेला भाग भरण्याची आवश्यकता होती. त्याशिवाय बंधाऱ्याच्या दारात अडकलेले फुरसानही काढण्याची आवश्यकता होती. मात्र यातील काहीच झाले नाही.
३) तरटगाव बंधाऱ्यात नववे दार टाकल्यानंतर बंधाऱ्यावरून पाणी न पडता बाजूच्या शेतातून पाणी पडते. त्यामुळे बाजूच्या साधारण आठ शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. शिवाय या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनाही एका दाराचे पाणी मिळत नाही. यासाठी येथील शेतकरी अनेक दिवसांपासून अधिकाऱ्यांकडे दुरुस्तीची मागणी करत आहेत. मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. याकडे गांभीर्याने पहाण्याची गरज आहे.
४) पोटेगाव बंधारा नादुरुस्त आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी त्यांच्या काळात या बंधाऱ्यासाठी निधी दिला होता. मात्र ते काम अद्याप झालेले नाही. त्यामुळे हा बंधारा देखील अडवता येणार नाही. संगोबा बंधारा सध्या चांगला आहे. मात्र त्याची देखभाल दुरुस्ती तत्काळ करण्याची गरज आहे. तरटगाव बंधारा व खडकी बंधाऱ्याचा तत्काळ भराव भरला तर पाणी अडवू शकते. बंधाऱ्याचे फुरसान काढण्याची गरज आहे.
५) पहिल्या पुरात बंधाऱ्याचे नुकसान कमी झाले होते. त्यानंतर पाटबंधारे विभागाने तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक होते. मात्र त्यानंतरही आलेल्या महापुरात बंधाऱ्याचे नुकसान वाढले. पाणी कमी झाल्यानंतर तत्काळ फुरसान काढणे आवश्यक आहे. मात्र काल शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम सुरु केले. तेथेही पैशाचा विषय निर्माण झाला. पालकमंत्री आले तेव्हा बंधाऱ्याचे जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. ऐनवेळेला कार्यलयातील दुसरे अधिकारी पाठवून दिले होते. त्यांच्या या निष्काळजीपणाला नेमका कोणाचा अभय आहे हे मात्र अनुत्तरित आहे.
कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे या रात्रंदिवस गावागावात भेटत आहेत. सर्वांना धीर देत आहेत. ‘माझी लोकं सुरक्षित कशी राहतील?’ याचा विचार त्या करत आहेत. पोलिसांसह संतोष वारे, ऍड. राहुल सावंत, तुषार शिंदे, डॉ. अमोल घाडगे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सांगोबत नागरिकांचे जीव वाचवले. पण झोपेचे सोंग करणाऱ्या या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संवेदना कधी जाग्या होतील? अशी चर्चा सुरु झाल्या आहेत.